आजपासूनच शहरात ‘पाणीबाणी’

By Admin | Updated: October 6, 2015 23:38 IST2015-10-06T23:35:34+5:302015-10-06T23:38:33+5:30

उद्यापासून कपात : विभागनिहाय सकाळ-सायंकाळ एकवेळ पुरवठा

Today 'waterborne' in the city | आजपासूनच शहरात ‘पाणीबाणी’

आजपासूनच शहरात ‘पाणीबाणी’

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन नाशिक महापालिकेमार्फत येत्या गुरुवार (दि.८) पासून एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असून, पाणीकपातीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. गुरुवारपासून पाणीकपात होणार असली तरी, महापालिकेने दुरुस्तीकामांसाठी बुधवारी सायंकाळी संपूर्ण शहरात होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, नाशिककरांना बुधवारी सायंकाळपासूनच ‘पाणीबाणी’ला सामोरे जावे लागणार आहे. गंगापूर धरणसमूहात समाधानकारक पाणीसाठा होईपर्यंत सदर पाणीकपात सुरू राहणार आहे.
शहर व परिसरात पावसाने अधूनमधून हजेरी लावली असली तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ७३ टक्के, तर धरणसमूहातील काश्यपी धरणात ५३ टक्के आणि गौतमी गोदावरी धरणात ५५ टक्के पाणीसाठा आहे. महापालिकेमार्फत दरवर्षी सुमारे ४२०० दशलक्ष घनफूट पिण्याचे पाणी आरक्षित केले जाते. मात्र, सप्टेंबर महिना उलटून गेला तरी गंगापूर धरणात आरक्षणाइतकाही पाणीसाठा शिल्लक नसल्याने महापालिकेने अखेर पाणीकपातीचा निर्णय घेतला. त्यानुसार, येत्या गुरुवार (दि.८) पासून संपूर्ण शहरात एकवेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. सद्यस्थितीत सिडको आणि सातपूरच्या काही भागात एकवेळ पाणीपुरवठा केला जातो. त्याठिकाणी कमी प्रमाणात कपात करण्यात येणार आहे, तर दोनवेळा पाणीपुरवठा होणाऱ्या भागात सुरुवातीला २० टक्के पाणीकपात केली जाणार असून, आवश्यकतेनुसार पुढे ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. गुरुवारपासून पाणीकपात सुरू होणार असल्याने पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी मंगळवारी सर्व अभियंत्यांची बैठक घेऊन कपातीबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या. याशिवाय, सर्व्हिस स्टेशन, वॉटरपार्क, जलतरण तलाव, महापालिकेची उद्याने, बांधकामाची ठिकाणे, शीतपेये व बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांचाही पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. दरम्यान, गुरुवारपासून पाणीकपात होणार असली तरी, महापालिकेमार्फत गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसविणे, सबस्टेशन विषयक कामे करणे, तसेच वितरण वाहिन्यांची दुरुस्ती करणे आदि कामे करून घेण्यासाठी बुधवारी वीजपुरवठा सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, बुधवारी संपूर्ण शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसून गुरुवारी (दि. ८) पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होणार आहे. बुधवारी रात्रीपर्यंत काम पूर्ण न झाल्यास गुरुवारी सकाळचाही पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. त्यामुळे, प्रत्यक्षात नाशिककरांना बुधवारी सायंकाळपासूनच पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today 'waterborne' in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.