आज ‘मुहर्रम’च्या चंद्रदर्शनाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:44 IST2018-09-10T01:44:40+5:302018-09-10T01:44:45+5:30

इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरुवात होईल.

Today, the possibility of 'Muharram's moonlight' | आज ‘मुहर्रम’च्या चंद्रदर्शनाची शक्यता

आज ‘मुहर्रम’च्या चंद्रदर्शनाची शक्यता

नाशिक : इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरुवात होईल. मुहर्रमनिमित्त मुस्लीमबहुल परिसरात विविध धार्मिक संघटनांच्या वतीने दहा दिवसीय प्रवचनमालांचे आयोजन करण्यात आले आहे.
इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू शहीद-ए-आजम हजरत इमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी मुस्लीम बांधव मुहर्रमच्या सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये ‘करबला’च्या स्मृतींना उजाळा देतात. इस्लामी कालगणना चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला चंद्रदर्शन घेऊन महिना बदलला जातो. चंद्रदर्शन न घडल्यास चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून पुढचा महिना सुरू होतो. मुहर्रमला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. मुहर्रमच्या दहाव्या दिवशी मुस्लीम बांधवांकडून आशुराचे नमाजपठण व प्रार्थना केली जाते.

‘इमामशाही’मध्ये सोहळा
सारडा सर्कल येथील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या आवारात मानाचा अळीवपासून (हालौ) तयार केला जाणारा ताबूत प्रसिद्ध आहे. हा ताबूत तयार करण्यासाठी सय्यद कुटुंबीयांकडून प्रारंभ क रण्यात आला आहे. मुहर्रमच्या नवव्या दिवसापर्यंत या ताबूताला पूर्णत: हिरवळीचा साज चढलेला पहावयास मिळतो. शेवटचे दोन दिवस या ठिकाणी यात्रोत्सव साजरा केला जातो.


या महिन्याचा दहावा दिवस ‘आशुरा’ म्हणून पाळला जातो. या दिवशी समाजबांधवांकडून ठिकठिकाणी सामूहिकरीत्या सरबतचे वाटप केले जाते.
यावर्षी मुहर्रम आाणि गणेशोत्सव हे दोन्ही सण एकाच कालावधीत साजरे होत असल्याचा दुर्मीळ योग जुळून आला आहे. राष्टÑीय एकात्मता सामाजिक बांधिलकी व जातीय सलोखा कायम जोपासावा असाच संदेश दोन्ही समाजासाठी हा योग देऊन जाणारा आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवदेखील बारा दिवस साजरा होतो आणि मुहर्रमचे सुरुवातीचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि या कालावधीत करबलाच्या स्मृती जागविल्या जातात. धर्मगुरूंकडून प्रवचनातून त्याबाबत प्रकाश टाकला जातो.

Web Title: Today, the possibility of 'Muharram's moonlight'