आजपासून मिशन भंगार बाजार !

By Admin | Updated: January 7, 2017 01:21 IST2017-01-07T01:21:23+5:302017-01-07T01:21:41+5:30

अतिक्रमणविरोधी मोहीम : मनपा सज्ज, व्यावसायिकांची अखेरपर्यंत धडपड

From today the mission scratched market! | आजपासून मिशन भंगार बाजार !

आजपासून मिशन भंगार बाजार !

नाशिक : चुंचाळे शिवार व अंबड-लिंकरोडवरील बहुचर्चित भंगार बाजार हटविण्याच्या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून संबंधित व्यावसायिकांनी अखेरपर्यंत धडपड केली, परंतु सारे प्रयत्न विफल ठरले आहेत. उच्च न्यायालयाने भंगार व्यावसायिकांची याचिका रद्दबातल ठरविली तर निवडणूक आयोगाद्वारे आचारसंहितेची ढाल पुढे करण्याचा प्रयत्नही फसल्याने अखेर शनिवारपासून (दि.७) महापालिकेमार्फत भंगार बाजारावर बुलडोझर फिरविला जाणार आहे. सुमारे शंभर एकर परिसरात पसरलेल्या या अनधिकृत भंगार बाजारविरुद्ध विशेष मिशन राबविण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी भंगार बाजार परिसरात पोलीस संचलन करण्यात आले.
गेल्या २० ते २५ वर्षांपासून अनधिकृतपणे वसलेल्या भंगार बाजारावर हातोडा पडणार हे आता निश्चित झाले आहे. महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, भंगार बाजारातील सुमारे ७४६ दुकाने हटविण्याची तयारी पूर्ण केली असून, त्यासाठी पथक सज्ज ठेवले आहे. मात्र, भंगार बाजार हटविण्यात येऊ नये यासाठी दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सातपूर स्क्रॅप मर्चंट असोसिएशन तसेच भंगार मालाचे व्यावसायिक मुक्तार अहमद अब्दुल रझाक यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कारवाई थांबविण्यासाठी याचिका दाखल केली. परंतु, महापालिकेसह सेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्या वकिलांनी युक्तिवाद करत उच्च न्यायालयाच्याच आदेशाने कारवाई होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्या. शंतनू केमकर व न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी होऊन न्यायमूर्तींनी भंगार मालाच्या व्यावसायिकांची याचिका रद्दबातल ठरविली. त्यामुळे महापालिकेचा कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला. महापालिका व दिलीप दातीर यांनी लगेच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, दुपारी उच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोच राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाकडून आचारसंहिता लागू झाल्याने मनपा स्तरावर भंगार बाजाराबाबत निर्णय घेण्याचे पत्र विभागीय आयुक्तांना धाडले गेले. मात्र, सातपूर स्क्रॅप मर्चंट असोसिएशनने
सदर निर्णय म्हणजे स्थगिती दिल्याचे सांगत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. अंबड- लिंकरोडवरील भंगार बाजारावर शनिवारी (दि.७) बुलडोझर चालविण्यात येणार आहे. कारवाईच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या उपस्थितीत पोलिसांनी संचलन केले.

Web Title: From today the mission scratched market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.