आज कुंभनगरीत ‘महापर्वणी’
By Admin | Updated: September 12, 2015 23:08 IST2015-09-12T23:07:39+5:302015-09-12T23:08:30+5:30
द्वितीय शाहीस्नान : गोदास्नानासाठी लाखो भाविक नाशिक-त्र्यंबकला दाखल

आज कुंभनगरीत ‘महापर्वणी’
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री रविवारी (दि. १३) महापर्वकाळ साधण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गोदातटी डेरा टाकला असून, अपार श्रद्धा आणि भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात नाशिक-त्र्यंबक नगरीला महायात्रेचे स्वरूप आले आहे. नाशिकला तपोवनातील साधुग्राममधून सकाळी ६ वाजता आखाडे व खालशांची शाही मिरवणूक निघणार असून, त्यात निर्मोही अनी आखाडा अग्रभागी राहणार आहे. मधोमध दिगंबर अनी आखाडा चालणार असून, सर्वात शेवटी निर्वाणी अनी आखाडा मिरवणुकीत सहभागी होणार आहे. मिरवणुकीत दिगंबर आखाड्याचे ४५०, निर्वाणी आखाड्याचे १७५ तर निर्मोहीचे ७२ खालसे रामकुंडाकडे शाहीस्नानासाठी मार्गक्रमण करतील. रामकुंडावर पहिल्यांदा निर्माेही अनी आखाड्याचे स्नान सकाळी
७ वाजता होणार असून, सुमारे १०.३० वाजेपर्यंत तीनही आखाडे व खालशांमधील साधू-महंतांचे स्नान आटोपल्यानंतर रामकुंड भाविकांना खुला करून दिला जाणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे द्वितीय पर्वणीला कुशावर्त तीर्थावर शाहीस्नानाचा मान श्रीपंचायती निरंजनी आखाड्याचा असून, त्यांच्यासोबतच श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाडा सहभागी होणार आहे. पहाटे ३.५५ वाजता त्र्यंबकेश्वरी नागा साधूंची शाही मिरवणूक सुरू होईल. पहाटे ४.१५ ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत दहाही आखाडे नियोजित क्रमानुसार स्नान करतील. त्यानंतर कुशावर्तही भाविकांना खुले करून दिले जाणार आहे.
पहिल्या पर्वणीला पोलिसांच्या अवाजवी बंदोबस्तामुळे भाविकांच्या संख्येवर झालेला परिणाम, भाविकांना सुमारे १५ ते २० किलोमीटर करावी लागलेली पायपीट, ठिकठिकाणी बॅरिकेडिंगमुळे आपत्कालीन व्यवस्थेलाही आलेले अडथळे हा सारा कटु अनुभव लक्षात घेत जिल्हा व पोलीस प्रशासनाने द्वितीय शाही पर्वणीचे फेरनियोजन केले असून, भाविकांना गोदाघाटाकडे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा, याकरिता बंदोबस्ताचा विळखा सैल केला आहे.
भाविकांसाठी शहरांतर्गत बससेवा तैनात करण्यात आल्याने पायपीट कमी होणार आहे, तर शहरातील काही भागात दुचाकी पार्किंगची व्यवस्था करत नाशिककरांवरीलही निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. रामकुंड आणि कुशावर्त भोवतालच्या कोअर एरियात मात्र बॅरिकेडिंग कायम राहणार असून, साधू-महंतांचे शाहीस्नान होईपर्यंत रामकुंड व कुशावर्त परिसरात भाविकांना मज्जाव करण्यात येणार आहे.
महापर्वणीला सुमारे ३० ते ३५ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी निवाराशेड, तसेच दिशादर्शक फलकांचीही व्यवस्था नाशिक महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. शहरातील चौकाचौकांत लावण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकांवरून भाविकांना मार्गदर्शनपर सूचना केल्या जात आहेत. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे शनिवारीच लाखो भाविकांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर गाठले असून, शहर व परिसरातील हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, धर्मशाळा, मंगल कार्यालये भाविकांच्या गर्दीने गजबजलेली आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरही भाविकांचा ओघ सुरूच आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली आहे.