आजपासून पोटनिवडणुकीचा डंका
By Admin | Updated: August 2, 2016 01:35 IST2016-08-02T01:35:13+5:302016-08-02T01:35:22+5:30
अधिसूचना जारी : ९ आॅगस्टपर्यंत अर्ज स्वीकृती

आजपासून पोटनिवडणुकीचा डंका
नाशिक : नाशिकरोड विभागातील महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि ३६ (ब) या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी येत्या २८ आॅगस्टला पोटनिवडणूक घेण्यात येणार असून, त्याची अधिसूचना मंगळवार, दि. २ आॅगस्ट रोजी जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार, पोटनिवडणुकीचे ढोल वाजण्यास सुरुवात होणार आहे. दि. २ ते ९ आॅगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.
नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक ३५ (ब) मधील मनसेच्या नगरसेवक शोभना शिंदे आणि प्रभाग ३६ (ब) मधील मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार यांना पक्षविरोधी मतदान केल्याबद्दल विभागीय आयुक्तांनी मनसेच्या तक्रारीवरून अपात्र घोषित केले होते. दरम्यान, दोन्ही अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धावही घेतली होती, परंतु पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईपर्यंत न्यायालयाकडून स्थगिती अथवा कोणताही आदेश प्राप्त झाला नाही. त्यामुळे निवडणूक शाखेकडून दि. २ आॅगस्ट रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार असून, दोन्ही प्रभागात दि. २८ जुलैच्या मध्यरात्रीपासूनच आचारसंहिता लागू झालेली आहे. पोटनिवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची माहिती लेखापरीक्षक गिरीश देशमुख यांच्याकडे राहणार असून, आचारसंहिता कक्षाची जबाबदारी उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती प्रशासन उपायुक्त विजय पगार यांनी दिली. दि. २ ते ८ आॅगस्ट या कालावधीत रोज सकाळी ११ ते ३ या वेळेत नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयात अर्जविक्री व उमेदवारांची अर्ज स्वीकृती प्रक्रिया राबविली जाणार आहे. दि. ९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते २ या वेळेतच अर्ज दिले जातील. रविवारी सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. महापालिकेने दोन्ही प्रभागांसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली असून, प्रभाग ३५ मध्ये १० हजार ५२५ (पुरुष- ५५७२ तर स्त्री- ४९५३) आणि प्रभाग ३६ मध्ये १० हजार ३९१ (पुरुष- ५३७४, स्त्री- ५०१७) याप्रमाणे मतदार आहेत. (प्रतिनिधी)