आज, उद्या सर्व दुकाने राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST2021-06-05T04:11:50+5:302021-06-05T04:11:50+5:30
नाशिक : शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात वीकेण्ड लाॅकडाऊन कायम राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने शनिवार अणि राविवारी ...

आज, उद्या सर्व दुकाने राहणार बंद
नाशिक : शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात वीकेण्ड लाॅकडाऊन कायम राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने शनिवार अणि राविवारी बंद राहणार आहेत. त्यामध्ये कोणतीही सूट देण्यात आलेली नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. जिल्ह्यात १ जूनपासून निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने व्यवहार सुरळीत सुरू झाले असले तरी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सर्व प्रकारची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
जिल्ह्यात बारा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे जिल्ह्यात लागू असलेले निर्बंध १ जूनपासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली तर हॉटेल्स, मद्य दुकाने यांना केवळ पार्सल सुविधेची मुभा देण्यात आलेली आहे. येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात लॉकडाऊन लागू आहे, तर नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेले असले तर वीकेण्ड लॉकडाऊन कायम आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस किराणा दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने बंदच राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी सर्व दुकाने व आस्थापना संपूर्णत: बंद राहणार आहेत. फक्त वैद्यकीय सेवा व मेडिकल दुकाने, दूध, वृत्तपत्रे विक्री, भाजीपाला व फळांची दुकाने सुरू राहणार आहेत तसेच हॉटेल्स व रेस्टॉरंट, फूड स्टॉल्समधील अन्नपदार्थांची फक्त घरपोहोच सेवा सुरू ठेवता येणार आहे. जिल्ह्यात या नियमांची अंमलबजावणी केली जाणार असून, या दोन दिवशी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या सुरू असलेले अन्य निर्बंध कायम राहणार असल्याचे तसेच त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.