टिप्पर गँगमधील गुन्हेगारांच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: July 13, 2016 00:06 IST2016-07-13T00:05:50+5:302016-07-13T00:06:59+5:30
टिप्पर गँगमधील गुन्हेगारांच्या कोठडीत वाढ

टिप्पर गँगमधील गुन्हेगारांच्या कोठडीत वाढ
नाशिक : सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगचा सूत्रधार नासीर पठाण, गण्या कावळ्या यांच्यासह आठ सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांनी २ जुलै रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली़ या सर्वांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ या सर्व गुन्हेगारांना मंगळवारी (दि़१२) न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे़ दरम्यान, या टोळीतील सराईत गुन्हेगार गणेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या याने एका साक्षीदारास धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.
सिडकोतील टिप्पर गँगचे प्रमुख सूत्रधार न्यायालयीन कोठडीत असतानाही गुन्हेगारीच्या घटना घडत होत्या़ टिप्परची दुसरी फळी सक्रिय झाल्याचे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांच्या लक्षात आले़ त्यांनी शाकीर नासीर पठाण, गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, मुकेश दलपतसिंग राजपतू, वसीम शेख, शाहीद सय्यद, सोन्या बापू पवार, देवदत्त तुळशीराम घाटोळे, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई केली़
सिडकोतील शुभम पार्कमधील एका फळविक्रेत्याकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर गँगमधील गुंडांविरोधात मोक्कान्वये कारवाई केली आहे.
या गुंडांच्या पोलीस कोठडीदरम्यान मुकेश राजपूत, गण्या कावळ्यासह इतर गुन्हेगार शिवाजीनगरमधील ध्रुवनगर परिसरातील एका इमारतीत राहात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. या टोळीतील गुन्हेगारांच्या आर्थिक स्त्रोताचा तपासही पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)