उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वरची सुनावणी सुरू, बहुतांश तक्रारी निकाली
By Admin | Updated: March 22, 2015 00:36 IST2015-03-22T00:36:22+5:302015-03-22T00:36:22+5:30
जिल्हा बॅँकेच्या हरकतींवर सोमवारी निर्णय

उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वरची सुनावणी सुरू, बहुतांश तक्रारी निकाली
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सभासद मतदार यादीबाबत काल (दि.२१) विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी एम. ए. आरिफ यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरकतींवर सुनावणी सुरू होती.
शनिवारी (दि.२१) पुन्हा जिल्हा बॅँकेच्या हरकतींवर सुनावणी झाली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सभासद प्रतिनिधी ठरावांबाबत नाशिक जिल्ह्णातून ७५ ते ८० तक्रारी प्राप्त झाल्या असून, विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर जिल्हा बॅँका मिळून एकूण ५४२ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी पाच हजार भागभांडवल असलेल्या सभासदांचे ठराव करण्याची अट टाकण्यात आली असून, विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे पाचशे रुपये जमा असल्याने त्यात चार हजार पाचशेंची भर टाकून एकूण पाच हजारांचे भागभांडवल दाखविण्यात आल्याबाबत तक्रारी व आक्षेप घेण्यात आल्याचे समजते. निफाड तालुक्यातील एकूण १५ तक्रारींवर सुनावणी झाली. त्यात बहुतांश तक्रारी व आक्षेप हे मुदतवाढीच्या काळात केलेल्या ठरावांचे मतदार ग्राह्य धरण्यासंदर्भात होते.
मात्र त्या तक्रारी फेटाळण्यात आल्याचे कळते. यावेळी माजी संचालक राजेंद्र डोखळे. राजेंद्र भोसले, विठ्ठल शिंदे, संपतराव व्यवहारे, माधवराव ढोमसे आदि उपस्थित होते. शनिवारी सिन्नर तालुक्यातील प्राप्त झालेल्या तक्रारीत आमदार राजाभाऊ वाजे यांच्याबाबत दोन तक्रारी असल्याचे कळते. त्यात वाजे हे थकबाकीदार संस्थेचे प्रतिनिधी असल्याचा आक्षेप होता. या संस्थेचा त्यांनी आठ-नऊ महिन्यांपूर्वीच राजीनामा दिल्याने ती तक्रार फेटाळण्यात आली, तर दुसरी तक्रार ते सिन्नर व्यापारी बॅँकेचे संचालक असताना बॅँकेची कलम ८८ नुसार चौकशी सुरू असून, त्यात ते दोषी असल्याची हरकत होती. सहकारमंत्र्यांनी ८८च्या चौकशीला स्थगिती दिलेली असल्यानेही तक्रारही निकाली काढण्यात आल्याचे कळते. सायंकाळी उशिरा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरकतींवर सुनावणी सुरू होती. माजी अध्यक्ष परवेज कोकणी यांच्यासह आजी-माजी संचालक यावेळी उपस्थित असल्याचे कळते. (प्रतिनिधी)