लासलगाव : येथील लोकमान्य टिळक गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे शहीद जवान रवींद्र धनावडे, संदीप ठोक, शहाजी गोरडे या जवानांसह सर्व शहीद जवानांना गुरुवारी सायंकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुजित जाधव, सिद्धांत शर्मा या जवानांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली.लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी सुंदर देखावे साकारले जातात. त्यावर अमाप खर्च केला जातो; मात्र या वर्षी देखाव्यांवर खर्च न करता आपल्या देशातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून देशभक्तीचा संदेश देण्यात आला. ‘कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा, भारतमाता की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ये मेरे वतन के लोगो, वंदे मातरम्, सारे जहाँ से अच्छा यासह अनेक देशभक्तिपर गीतांनी परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी बाबा अमरनाथ सोशल ग्रुप, गोविंद सेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मित्रमंडळाचे दत्ता भंडारी, अमोल जगताप, भूषण वालेकर, राहुल खाबेकर, ऋषी सोनवणे, संकेत वालेकर, सूरज श्रीवास्तव, संदीप उगले, पवन सानप यांसह अनेक कार्यकर्त उपस्थित होते. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले.
टिळक मंडळातर्फे शहिदांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:16 IST