भगवा फडकविण्याची जबाबदारी तिघांवर?
By Admin | Updated: March 1, 2017 01:12 IST2017-03-01T01:12:21+5:302017-03-01T01:12:39+5:30
नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपाची जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी सुरू असलेली चर्चा पाहून शिवसेनेनेही आता सत्ता स्थापनेचे ‘शिवधनुष्य’ उचलण्याची जबाबदारी तिघा शिलेदारांवर सोपविल्याची चर्चा आहे.

भगवा फडकविण्याची जबाबदारी तिघांवर?
नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपाची जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी सुरू असलेली चर्चा पाहून शिवसेनेनेही आता सत्ता स्थापनेचे ‘शिवधनुष्य’ उचलण्याची जबाबदारी तिघा शिलेदारांवर सोपविल्याची चर्चा आहे. मंगळवारी (दि. २८) यासंदर्भात मातोश्रीवर खलबते झाल्याचे समजते. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक २५ संख्याबळ असूनही भाजपा - राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्यास शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ येणार आहे. त्यामुळेच खडबडून जागे झालेल्या शिवसेनेने जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील घडमोडींची माहिती देण्यात आल्याचे कळते. त्यातूनच मग जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याची जबाबदारी या तिन्ही नेत्यांवर सोपविण्यात आल्याचे कळते. शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीला जोडीला घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करू शकते. चार अपक्षांपैकी दोेन अपक्षांना गोंजरण्यास शिवसेनेने सुरुवात केल्याचे समजते. त्याचबरोबर भाजपासोबत माकपा जाणार नाही, हे गृहीत धरून माकपाच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन प्रसंगी त्यांना सभापतिपद देऊन शिवसेना जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
गटनोंदणीचे अधिकार प्रवीण जाधव यांना
शिवसेनेच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांची गटनोंदणी बुधवारी (दि.१) होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी दिली. गटनोेंदणी करण्यासाठी विद्यमान गटनेते प्रवीण जाधव यांना अधिकार देण्यात आल्याचे समजते. प्रवीण जाधव अनुभवी असल्याने गटनोंदणी करण्यासाठी शिवसेनेने जाधव यांना नेमल्याचे समजते. शिवसेनेच्या गटनेतेपदी माजी आमदार धनराज महाले यांची निवड केली जाणार असल्याचीही चर्चा आहे.