दिवसभर या धूलिकणांची चादर कायम

By Admin | Updated: April 6, 2015 01:07 IST2015-04-06T01:06:28+5:302015-04-06T01:07:14+5:30

दिवसभर या धूलिकणांची चादर कायम

Throughout the day these dust coverings remain | दिवसभर या धूलिकणांची चादर कायम

दिवसभर या धूलिकणांची चादर कायम

नाशिक : सौदी अरेबियात झालेल्या वाळवंटातील वादळाचा परिणाम जगभरातील विविध देशांमध्ये दिसून येत असून, वादळ झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी त्याचे पडसाद नाशिककरांना रविवारी सकाळपासून जाणवले. अतिसूक्ष्म धूलिकणांनी व्यापलेले आकाश आणि अस्पष्ट दिसणारे रस्ते यामुळे धुके नसतानाही प्रथमच वाढलेल्या आर्द्रतेचा अनुभव शहरातील नागरिकांनी घेतला.नाशिकमध्ये प्रत्येक महिन्यात पाऊस पडल्यानंतर नाशिकवर आच्छादली जाणारी धुक्याची चादर हा अनुभव नाशिककरांसाठी नवा नाही; परंतु रविवारी उजाडलेली सकाळ नाशिककरांसाठी वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळी उजाडल्यापासूनच वातावरणात काहीसे धुके जाणवत असल्याने पावसाचे वातावरण आहे की काय या शंकेने अनेकांनी आभाळाकडे पाहिले; परंतु ढग नसतानाही दाटलेले धुके बघून जो तो या विचित्र वातावरणाबद्दल एकमेकांना विचारत होते. सोशल मीडियावर तर त्याची अनेक छायाचित्रेही टाकण्यात आली होती. केवळ नाशिकच नाही तर गुजरात, राजस्थानचा काही प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रावर दिवसभर या धूलिकणांची चादर कायम होती. सौदीतील दुबई येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वाळूच्या वादळात वाऱ्याबरोबर उडालेले धूलिकण पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच प्रवास करीत आहेत. त्यामुळे ज्या वेगात आणि दिशेने वारे वाहतील त्याच दिशेने हे वादळ फिरण्याची दाट शक्यता आहे. वाऱ्याबरोबर फिरत असलेले हे धूलिकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते त्वरित जमिनीवर बसण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे कण वातावरणात कायम राहणार असून, आकाशकडे पाहिल्यास गुलाबी रंगाच्या छटा दिसत आहेत. सलग दोन ते तीन वर्षांपासून आखाती देशांतील वादळाचे पडसाद राज्यात दिसून येत असून, मागच्या वेळेस ते केवळ मुंबईपुरताच मर्यादित होते; परंतु यंदा या वादळाने अरबी समुद्र ओलांडून थेट गुजरात आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धडक दिली आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने हे धूलिकण रायगड, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, नाशिक, नगर या परिसरात धूलिकरांचे अस्तित्व दिसून येत होते.
या वादळामुळे दृष्यता निम्म्यावर आली होती. सामान्य वातावरणात ती ६००० मीटर इतकी असून, या वादळामुळे ती केवळ तीन हजार मीटर इतकीच राहिली होती. त्यामुळे काही अंतरावर असलेल्या वस्तूही दिसू शकत नव्हत्या. सुमारे २४ तास हे वातावरण कायम राहणार असून, वाऱ्याचा वेग ज्या दिशेने असेल त्या दिशेने हे धूलिकण प्रवास करतील. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत हे धूलिकण जमिनीशी एकरूप होणार नाहीत आणि त्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत जाईल, हवेतील हे धूलिकण नाहीसे होण्यासाठी किती दिवस लागतील त्याचा अंदाज लावता येत नसल्याचे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगतले. (प्रतिनिधी)

Web Title: Throughout the day these dust coverings remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.