रोमांचक सामना : पक्ष कोणतेही असले तरी लढत कोकाटे-वाजे अशीच होणार
By Admin | Updated: July 25, 2014 00:39 IST2014-07-24T23:08:36+5:302014-07-25T00:39:23+5:30
बहुरंगी राजकारणाची ‘दुरंगी’ वाटचाल

रोमांचक सामना : पक्ष कोणतेही असले तरी लढत कोकाटे-वाजे अशीच होणार
सिन्नर : गेल्या पाच वर्षांत सिन्नरच्या राजकारणात वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या असल्या तरी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरला दुरंगी लढत होईल, अशी स्थिती आहे. पक्षापेक्षा व्यक्तिभोवती पिंगा घालणाऱ्या कार्यकर्त्यांनी गटा-तटाच्या राजकारणाला प्रारंभ केल्याने विधानसभेची निवडणूक बहुरंगी होण्यापेक्षा दुरंगी राहील, असे चित्र आहे. आमदार माणिकराव कोकाटे आणि जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे यांच्यातच रोमांचक लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
१५ आॅगस्टनंतर आचारसंहिता लागू होण्याचे संकेत मिळत असले तरी त्यापूर्वीच सिन्नरचे राजकीय वातावरण तापले आहे. वाजे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोकाटे कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील याबाबत अजूनही तर्कवितर्क लढविले जात आहेत. शिवसेना-भाजपा युतीच्या संसारात सिन्नर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सिन्नरची जागा कॉँग्रेसकडे आहे. वाजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेकडून तेच उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वीच कोकाटे यांनी नाशिक येथे कॉँग्रेसच्या पक्ष निरीक्षकांना आपण विधानसभेसाठी इच्छुक नसल्याचे सांगून नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरले आहे. त्यातून त्यांनी पक्षबदलाचे संकेत दिल्याचेही मानले जात आहे. गेल्या नऊ वर्षांपूर्वी नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले कोकाटे आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा असल्या तरी त्यांचा पक्ष कोणताही असला तरी सामना मात्र वाजे यांच्यासोबतच होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व मनसे या पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मशागतीला प्रारंभ केला आहे. शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी तालुकाप्रमुख दिगंबर देशमुख, पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ व छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर इच्छुक आहेत. सिन्नरची जागा भाजपाला मिळावी यासाठी भाजपाचे नेते आग्रही आहेत. तालुकाध्यक्ष सुनील केकाण व भाऊसाहेब शिंदे यांनी निवडणूक लढविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा बोलून दाखविली आहे. आघाडीत बिघाडी झालीच तर बंडूनाना भाबड, कोंडाजीमामा आव्हाड किंवा अॅड. भगीरथ शिंदे यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीची तयारी आहे. मनसेकडून जयंत आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी कोकाटे व वाजे या दोन तगड्या उमेदवारांमध्येच सामना होईल, अशी चर्चा जोर धरूलागली आहे. त्यादृष्टीने कोकाटे व वाजे समर्थकांनी बांधबंदिस्ती सुरू केली आहे.
गत विधानसभा निवडणुकीनंतर ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते पाच वर्षे निष्ठेने पक्षाचे काम करीत होते. मात्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पक्षाची बंधने झुगारून व्यक्तिनिष्ठेला महत्त्व देत गटा-तटाच्या राजकारणाला प्रारंभ केल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिन्नरच्या राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तीला महत्त्व आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ पाहत आहे.
वाजे यांच्या सेना प्रवेशापाठोपाठ त्यांचे अनेक समर्थक हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत. कोकाटे समर्थकांचीही तीच स्थिती आहे. ते जातील तिकडे त्यांचे समर्थक जातात. त्यामुळे आगामी निवडणूक व्यक्तिनिष्ठ असणार आहे हे नक्की.