ताल सप्तक आणि कथक नृत्यांच्या आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

By Admin | Updated: September 5, 2015 00:15 IST2015-09-05T00:15:09+5:302015-09-05T00:15:36+5:30

पं. बिरजू महाराज आणि बिंदादिन महाराजांच्या रचनांचाही अंतर्भाव

Thriller charm with the invention of rhythm and kathak dances | ताल सप्तक आणि कथक नृत्यांच्या आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

ताल सप्तक आणि कथक नृत्यांच्या आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

नाशिक : नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे आवर्तन संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.४) आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी ताल सप्तक आणि कथक नृत्याविष्काराचे सादरीकरण करण्यात आले.
प्रारंभी ‘वन्दे शिवम् शंकरम्’ ह्या शिववंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तालसप्तकाचा आविष्कार सादर करताना ‘ताल’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून कीर्ती भवाळकर यांच्या दिग्दर्शनातून तालसप्तकची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. तालसप्तकाच्या सुरुवातीला दादरा तालातील ‘जादू भरेली कौन अलबेली‘ या ठुमरीने प्रेक्षकांची दाद मिळवली. यानंतर पं. बिरजू महाराज यांनी रचलेल्या ‘श्रीकृष्ण निरतत थुंग थुंगा’ ह्या रूपकाची रचना प्रस्तुत करण्यात आली. या रचनेतून श्रीकृष्ण राधेबरोबर आणि गोपिकांबरोबर गायन, वादन, नृत्य यात रंगून जायचा हे चित्र दाखविणारी रचना वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
यानंतर केहेरेवा तालातील ‘सजन बीना ना लागे जिया मोरा’, बिंदादिन महाराजांच्या रचनेतील ‘शाम छबी अति बनी’, एकतालातील मेघश्याम घनश्याम, घमार तालातील होरी आणि तराणा, त्रिताल आणि भैरवी रागातील ‘शिव के मन मे शरण हो’ या नृत्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
समारोहाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ नृत्यांगना पंडित मंजिरी देव यांच्या कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. सुरुवातीला गणेशवंदना, त्यानंतर कृष्णवंदना आणि कृष्ण भजनाच्या भावाभिनयाने प्रेक्षकांना भक्तिरसाची अनुभूती दिली. यानंतर मंजिरी देव यांनी विलंबित ते दृत या लयींच्या विविध टप्प्यांवरील तोडे, तुकडे, ततकार यांच्या सादरीकरणासह कथकच्या बनारस घराण्याच्या बंदिशींचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाची सुरुवात भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित, कीर्ती भवाळकर, सायली मोहाडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. अरविंद भवाळकर यांनी प्रकाश योजना, रंगभूषा माणिक रानडे तर पराग जोशी यांनी ध्वनी संयोजन केले होते. सूत्रसंचालन धनेश जोशी यांनी केले.

Web Title: Thriller charm with the invention of rhythm and kathak dances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.