सटाण्यातील तिघे तरुण अपघातात ठार
By Admin | Updated: December 6, 2015 22:42 IST2015-12-06T22:41:20+5:302015-12-06T22:42:25+5:30
शोककळा : शेमळीनजीकची घटना; दोन जण गंभीर

सटाण्यातील तिघे तरुण अपघातात ठार
सटाणा : सटाणा-मालेगाव रस्त्यावरील शेमळीजवळ तवेरा आणि ट्रकच्या भीषण अपघातात येथील तीन तरुण जागीच ठार झाले. ही घटना रविवारी (दि. ६) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शहरावर शोककळा पसरली आहे. ट्रकचालकाविरु द्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
सटाण्यातील रोशन सोनवणे, रौनक भांगडिया, प्रवीण पवार, सतीश परदेशी यांच्यासह अन्य एक असे पाच मित्र शनिवारी दुपारी साईदर्शनासाठी तवेरा गाडीने शिर्डीला गेले होते. शिर्डी येथून दर्शन घेऊन परतताना त्यांच्या एमएच २० बीसी ५१३० क्रमांकाच्या वाहनाला शेमळीजवळ समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात रोशन विजय सोनवणे (२३, रा. संतोषनगर, मालेगाव रोड), रौनक शांतीलाल भांगडिया (२५, रा. मित्रनगर) व तवेराचालक सतीश कैलास परदेशी (२६, रा. अहिल्याबाई चौक) यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोशन अनाजी सोनवणे (२३ रा. संतोषनगर, मालेगाव रोड) व प्रवीण रघुनाथ पवार (२२, संतोषनगर, मालेगाव रोड) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रवीण पवार याची प्रकृती चिंताजनक असून, रोशन सोनवणे याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिलीे. तिघांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. तिघाही मृतदेहांवर रविवारी सकाळी ११ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सटाणा पोलिसांनी निर्दयीपणे म्हशी कोंबून घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकास अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील करीत आहेत. (वार्ताहर)