तीन दुचाकींची जाळपोळ
By Admin | Updated: March 24, 2015 00:17 IST2015-03-24T00:17:18+5:302015-03-24T00:17:28+5:30
मध्यरात्रीची घटना : नागरिकांत भीतीचे वातावरण

तीन दुचाकींची जाळपोळ
पंचवटी : दिंडोरीरोडवरील आकाश पट्रोलपंपाजवळ असलेल्या सप्तशृंगी छाया अपार्टमेंटमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला अज्ञात समाजकंटकांनी तीन उभ्या दुचाकींची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. भरवस्तीत घडलेल्या या जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून, परिसरातील वाढत्या गुन्हेगारीकडे पंचवटी पोलिसांनी वेळीच लक्ष केंद्रित न केल्याने ही घटना घडल्याचा खळबळजनक आरोप नागरिकांनी केला आहे.
समाजकंटकांनी केलेल्या कृत्यात तीन दुचाकी जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती अशी की, दिंडोरीरोडवरील आकाश पेट्रोलपंप परिसरात सप्तशृंगी छाया अपार्टमेंट येथे नगरसेवक गणेश चव्हाण यांचे जुने संपर्क कार्यालय असून, याच इमारतीत ही घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला या इमारतीच्या वाहनतळावर संजय पटेल, शैलेश पटेल तसेच गणेश कुलकर्णी यांच्या मालकीच्या यामाहा एफ झेड, हिरो होंडा शाईन तसेच अॅक्टिव्हा अशी तीन वाहने उभी होती. मध्यरात्री पावणेबारा वाजता काहीतरी जळण्याचा वास आल्याने तसेच धुराचे लोळ निघत असल्याचे इमारतीत राहणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी खाली येऊन पेटत्या दुचाकींना लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती कळविली त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करून ही आग विझविली. या आगीत संजय व शैलेश पटेल यांची यामाहा दुचाकी क्रमांक ( जी. जे. ६ डी. एफ. ६१३४), हिरो होंडा शाईन (एम. एच. ०४ डी. झेड. १९१) व कुलकर्णी यांची अॅक्टिव्हा (एम. एच. १५ इ. क्यू. ३९७५) अशा तीन दुचाकी जळाल्या आहेत.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, सोमवारी दुपारपावेतो कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता आणि कोणत्याही संशयिताला ताब्यात घेतले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (वार्ताहर)