लूटमारीचे तीन तेरा, तरीही अभ्यासाला सातारा
By Admin | Updated: October 6, 2015 23:27 IST2015-10-06T23:26:25+5:302015-10-06T23:27:03+5:30
जिल्हा बॅँक : संचालक मंडळाची भूमिका वादात

लूटमारीचे तीन तेरा, तरीही अभ्यासाला सातारा
नाशिक : गेल्या तीन-चार महिन्यांत डझनवारी लूटमारीच्या घडलेल्या घटना, पाठोपाठ उठलेले सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीचे काहूर, या सर्वांवर कळस म्हणजे सर्वसाधारण सभेत चक्क काही संस्थांच्या कर्जमाफीचे ठराव आणि दुसरीकडे शंभर टक्के कर्ज वसुलीसाठी नियोजित सातारा अभ्यास दौरा.. या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ग्रामीण भागातील शाखांमध्ये एका पाठोपाठ एक रोख रक्कमेची लूटमार आणि सोने-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनांत दिवसागणिक वाढ होत आहे. कालही (दि.६) येवला तालुक्यातील जळगाव नेऊर शाखेत चोरीची घटना घडली. चोऱ्या रोखण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सर्व २१३ शाखांमध्ये चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाचे एकमत झाले असले तरी, अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. उलट ही खरेदीची प्रक्रियाच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या विरोधात काही ठेकेदार मंडळी न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत सातारा येथील सहकारी संस्था सचिवांच्या सेवा जिल्हा बॅँकेच्या कक्षेत आणल्याने तेथे शंभर टक्के वसुली होत असल्याचे सांगत येत्या १३ व १४ आॅक्टोबर रोजी जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाने सातारा येथे अभ्यास दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यास दौऱ्याचे प्रयोजनाचा उद्देश जरी चांगला असला तरी प्रत्यक्षात जिल्हा बॅँकेच्या ग्रामीण भागातील शाखांमध्ये दिवसागणिक चोऱ्या आणि लूटमारीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असतानाच आणि त्यातील संशयित दरोडेखोरही सापडत नसताना त्यावर तत्काळ प्रभावीपणे उपाययोजना करण्याऐवजी संचालक मंडळ अभ्यास दौऱ्याच्या तयारीत मश्गुल असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक पाहता रानवड येथील शाखेत चक्क लॉकर फोडून कोट्यवधी रुपयांची सोने चोरी होण्याच्या घटनेनंतर जेथे जेथे रोकड व सोने ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा आहे, तेथे रात्रपाळीसाठी तत्काळ एका शिपायाची नेमणूक करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात रात्रपाळीसाठी शिपायांची नेमणूक झाली काय? याबाबत चर्चा आहे. खासगी बॅँकांमध्ये तुलनेने चोऱ्या कमी होत असताना प्रत्यक्षात फक्त जिल्हा बॅँकांच्याच शाखांमध्ये चोऱ्या का होत आहेत? याबाबत जिल्हा बॅँकेच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.(प्रतिनिधी)