विंचूर परिसरात तीन चोरटे पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: August 9, 2015 22:27 IST2015-08-09T22:26:36+5:302015-08-09T22:27:25+5:30
दहशत : सुभाषनगर ग्रामस्थांची मदत

विंचूर परिसरात तीन चोरटे पोलिसांच्या ताब्यात
विंचूर : पंधरवड्यापासून विंचूरसह परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्यांपैकी तीन संशयितांना सुभाषनगर येथील ग्रामस्थांच्या मदतीमुळे व पोलिसांच्या सतर्कतेमुळे ताब्यात घेण्यात आले.
बापू दत्तू सोदक (२२, रा. ठोकळवाडी, ता.निफाड), किरण छगन सोनवणे (२८, रा.दत्तनगर, कोपरगाव), संतोष बबन वाकचौरे (१९, रा. पारेगाव, ता. येवला) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
विंचूरसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी वाड्या वस्त्यांवर धुमाकूळ घातल्याने दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी डोंगरगावलगत असलेल्या जगदंबा सोसायटीत दरोडेखोरांनी धाडसी चोरीचा प्रयत्न करून गुरख्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांकडून व पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली.
तरीही चोरटे येण्याचे बंद न झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने तीन चोरांना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले. सहायक पोलीस निरीक्षक सानप, स.पो.उ.नि. आर.टी. तांदळकर, हेड काँस्टेबल एल.के.धोक्रट, हवालदार सांगळे, बिन्नर, दरगुडे यांनी रात्री गस्तीच्या दरम्यान या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. तिघांवर यापूर्वी कोपरगाव भागात चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)