तीन खोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी
By Admin | Updated: August 18, 2016 01:33 IST2016-08-18T01:33:09+5:302016-08-18T01:33:55+5:30
आयुक्तांना निवेदन : वडाळा उर्दू हायस्कूलमध्ये सोयी-सुविधांची वानवा

तीन खोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी
नाशिक : शहरात महापालिकेच्या केवळ दोन उर्दू माध्यमिक शाळा असून, यापैकी एक वडाळागावात आहे. या शाळेला मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र इमारतीची प्रतीक्षा आहे. तीन वर्गखोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी बसत आहेत. तसेच अन्य सोयीसुविधांचीदेखील वानवा आहे. याबाबत स्थायी समिती सदस्य रशिदा शेख यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांचे लक्ष वेधले आहे.
वडाळागावात एकाच इमारतीमध्ये सकाळ-दुपार सत्रात प्राथमिक शाळा भरते, तर याच इमारतीच्या तळमजल्यावरील तीन खोल्यांमध्ये माध्यमिक विद्यालयाचे वर्ग भरत आहेत. सुरुवातीला शाळेची पटसंख्या कमी होती. त्यामुळे गैरसोय होत नव्हती मात्र मागील पाच वर्षांपासून शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली असून, सुमारे पावणे तीनशे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. वर्गखोल्यांची संख्या अपुरी असल्यामुळे संगणक कक्ष,
प्रयोगशाळादेखील या ठिकाणी चालविता येणे अवघड झाले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन इमारतीच्या गच्चीवर मंडप टाकून केले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृह नसून पिण्याच्या पाण्याचीही मुबलक व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आलेली नसल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे.
पाच वर्षांपासून सातत्याने उर्दू माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे.
एकूणच गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारत असताना भौतिक सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण मंडळ सभापती व प्रशासनाधिकाऱ्यांनी या शाळेत भेट देण्याची मागणी होत आहे. पंधरवड्यात शाळेच्या समस्या न सोडविल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाची एक प्रत प्रशासनधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)