कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक
By Admin | Updated: August 18, 2016 01:47 IST2016-08-18T01:44:52+5:302016-08-18T01:47:06+5:30
कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक
लोहोणेर : मालेगाव येथे अवैधरीत्या कत्तलीसाठी चार गायी व एक वासरू घेऊन जाणाऱ्या वाहनाचा गेल्या सोमवारी (दि. १५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने मुद्देमालासह तीन आरोपींना ताब्यात घेतले. याबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसाका परिसरातून एक पिकअप गाडी (एमएच ०२ वायए ३८५२) अवैधरीत्या गायी घेऊन जात असल्याचा सुगावा लोहोणेर येथील युवक किरण देशमुख, भय्या निकम, आबा सोज्वळ, भिका जाधव, नंदू जाधव, महेंद्र पवार, भारत जाधव, पोलीसपाटील अरुण उशिरे, संजय उशिरे, मनोज जगताप, रोशन अहेर, राजू कुऱ्हाडे यांना लागला त्यांनी घटनास्थळी जाऊन वाहनाच्या चालकाला विचारणा केली असता सदर वाहनचालकाने सुसाट वेगात गायींसह वाहन काढून देवळा शहाराच्या दिशेने पलायन केले. रस्त्यात सदर वाहनाने अनेक गाड्यांना हुलकावणी दिली तसेच लोहोणेर येथील युवकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस गाडीने वाहनाचा पाठलाग करून मेशी शिवारातील मल्हारवाडी परिसरात वाहन अडविले. अंधाराचा फायदा घेत गाडीतील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधारात त्यांना शेतातील विहीर लक्षात न आल्याने तिघेही विहिरीत पडले. साधारण ३० फूट पाणी असलेल्या विहिरीत पडलेल्या तिघांनाही देवळा पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास बाहेर काढून ताब्यात घेतले. सदर वाहनात चार गायी व एक वासरी असल्याचे निदर्शनास आले असून, अवैधरीत्या मालेगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याने पोलिसांनी वाहनासह गायी व शेख हारु ण शेख, अजहर अहमद इजाज अहमद, अतिक खान खालिद खान या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली. दरम्यान, चार गायी व एक वासरी ताहाराबाद येथील गोशाळेत रवाना करण्यात आले. (वार्ताहर)