तीन पक्ष चार नगरसेवक, आता कोणात होणार लढत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:44+5:302021-09-26T04:16:44+5:30

सातपूर : तब्बल सहा झोपडपट्ट्या असलेल्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये रिपाइंचे प्रकाश लोंढे यांनी तब्बल २० वर्षे नेतृत्व केले ...

Three parties, four councilors, who will fight now? | तीन पक्ष चार नगरसेवक, आता कोणात होणार लढत?

तीन पक्ष चार नगरसेवक, आता कोणात होणार लढत?

सातपूर : तब्बल सहा झोपडपट्ट्या असलेल्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये रिपाइंचे प्रकाश लोंढे यांनी तब्बल २० वर्षे नेतृत्व केले आहे.मागील निवडणुकीत लोंढे यांना आरक्षणाचा फटका बसला असला तरी त्यांनी सून दीक्षा लोंढे यांच्या माध्यमातून सत्ता ताब्यात ठेवली आहे, तर सलीम शेख यांच्यामुळे मनसेनेदेखील आपले अस्तित्व कायम राखले आहे. आता त्रिसदस्यीय प्रभाग जाहीर झाल्याने मनसे आणि रिपाइंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत सातपूर कॉलनी, सातपूर गावठाण, कामगारनगर यासह सहा झोपडपट्ट्या मिळून प्रभाग क्रमांक ११ची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी या प्रभागात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारी वाटपावरून बराच गदारोळ झाला होता. फक्त तीनच उमेदवार देऊन भाजपाने नामुष्की ओढवून घेतली होती. त्यामुळे बंडखोरीचा फटका बसला होता. शिवसेनेच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते.

या प्रभागात अगोदर २० वर्षे प्रकाश लोंढे आणि ५ वर्षे दीक्षा लोंढे असे २५ वर्षे सत्ता लोंढे कुटुंबीयांनी ताब्यात ठेवली आहे. याच प्रभागातून यंदा मनसेचे सलीम शेख आणि योगेश शेवरे तसेच शिवसेनेच्या सीमा निगळ हे निवडून आल्या आहेत. सलीम शेख यांचा प्रभाव असलेल्या सातपूर कॉलनीमुळे शेख यांच्याबरोबरच योगेश शेवरे विजयी झालेत, तर त्यावेळी सातपूर गावठाण पाठीशी असल्याने सीमा निगळ विजयी झाल्या होत्या. मनसे आणि रिपाइं यांनी प्रभावक्षेत्रामुळे निर्माण केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह बसपा हा प्रभाव कमी करतील का? हा प्रश्न आहे. त्यातच आता त्रिसदस्यीय लढत असल्याने पुन्हा वेगवेगळी समीकरणे गोंधळ वाढवणार आहे, त्यामुळे कोणते उमेदवार कोणासमोर येतील याविषयी शंका आहे.

इन्फो..

प्रभागातील प्रमुख समस्या -

- एमआयडीसीत भुयारी गटार योजना कार्यान्वित नाही.

- कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला टॉऊन हॉल धूळखात पडून

- महादेवनगरातील समाजमंदिराची झालेली दुरवस्था.

- तरण तलाव सुविधांपासून वंचित आहे.

- परिसरातील एकमेव जॉगिंग ट्रॅक सुविधांपासून वंचित.

- खोका मार्केटमध्ये रस्त्यांची झालेली दुरवस्था

.....

इच्छुक :

मनसे : सलीम शेख,योगेश शेवरे,योगेश लभडे, विजय अहिरे, प्रकाश निगळ,

रिपाइं : प्रकाश लोंढे, दीक्षा लोंढे.

शिवसेना : सीमा निगळ, तुकाराम मोराडे, दीपक मौले, संदीप सोनवणे, मंदाकिनी गवळी, हर्षा दोंदे, योगेश गांगुर्डे,

भाजप : गौरव बोडके, संजय राऊत, राजेश दराडे, मंदाकिनी संभेराव, चारुदत्त आहेर, संदीप काळे, नीलेश भंदुरे, संतोष धात्रक.

राष्ट्रवादी : नितीन निगळ, जीवन रायते, डॉ.सुनील आंधळे, नीलेश भंदुरे, ऋषीराज खरोटे.

काँग्रेस : माया काळे, दादा निगळ, भिवानंद काळे.

बसपा : अरुण काळे.

इतर : बजरंग शिंदे, दिलीप निगळ, विजय भंदुरे, गणेश निगळ.

-----

सलीम शेख, दीक्षा लोंढे, सीमा निगळ यांचे फोटो वापरावेत.

Web Title: Three parties, four councilors, who will fight now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.