महापालिकेचे तीन कर्मचारी बडतर्फ
By Admin | Updated: July 2, 2017 01:10 IST2017-07-02T01:03:34+5:302017-07-02T01:10:33+5:30
महापालिकेचे तीन कर्मचारी बडतर्फ

महापालिकेचे तीन कर्मचारी बडतर्फ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिका सेवेत रुजू झाल्यानंतरही जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या बिगारी या पदावर कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना प्रशासनाने बडतर्फ केले आहे. अनुसूचित जमाती कल्याण समितीने याबाबत गंभीर दखल घेतल्यानंतर महापालिकेने शनिवारी (दि.१) सायंकाळी कारवाई केली.
राज्य विधिमंडळीय अनुसूचित जमाती कल्याण समिती गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहे. दोन दिवसांपूर्वी समितीमार्फत महापालिकेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपस्थित झाला असता समितीने त्याबाबत प्रशासनाला कारवाईबाबत जाब विचारला होता. शनिवारी (दि.१) पुन्हा समितीपुढे महापालिका अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली. त्यानंतर मनपा प्रशासनाने जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बिगारी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची कारवाई केली. प्रशासनाने सदर कर्मचाऱ्यांना यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. सदर कर्मचारी हे सन २००३ पासून महापालिका सेवेत कार्यरत होते. दरम्यान, जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करता पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १५ असून त्यांनाही येत्या १५ दिवसांत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधी नोटिसा बजावल्या जाणार आहेत. मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांना पदावनत केले जाणार असल्याची माहिती दिली.