आमदार तीन, जागा अवघ्या पाच...

By Admin | Updated: February 25, 2017 00:57 IST2017-02-25T00:56:52+5:302017-02-25T00:57:07+5:30

दोन प्रभागांतील निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा

Three of the MLAs, only five seats ... | आमदार तीन, जागा अवघ्या पाच...

आमदार तीन, जागा अवघ्या पाच...

संजय पाठक : नाशिक
उच्चभ्रू वसाहत म्हणजे भाजपाची मतपेढी असे मानल्या जात असले तरी नाशिक महापालिकेच्या पश्चिम प्रभागात हे आताच साध्य झाले आहे. कॉँग्रेससह सर्वच पक्षांच्या प्रभावात कमी अधिक असलेल्या या प्रभागात आज जोडलेल्या दोनच प्रभागांत भाजपाने आठपैकी पाच जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे ज्या एका प्रभागात तीन भाजपा आमदार आहेत, त्या प्रभागातही संपूर्ण पॅनल विजयी न होणे ही बाब खचीतच आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आहे. सीबीएसकडून पश्चिमेचा भाग असलेल्या पश्चिम प्रभागात मध्य नाशिकचे काही प्रभाग जोडले जातात. त्यामुळे केवळ गेल्यावेळेचाच विचार केला तर सात द्विसदस्यीय प्रभागात १४ पैकी भाजपाच्या वाटेला अवघ्या तीन जागाच होत्या. त्यापेक्षा अधिकतम मनसेच्या म्हणजेच पाच, त्याखालोखाल चार जागा कॉँग्रेस, तर दोन जागा सेनेच्या ताब्यात होत्या. आता प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने दोनच चार सदस्यीय प्रभाग जोडल्या गेलेल्या पश्चिम प्रभागात जेमतेम आठ जागा. अशा स्थितीत लागलेल्या निकालाने भाजपाच्या वाटेला पाच आणि दोन कॉँग्रेस, तर एक जागा शिवसेनेला मिळाली आहे. मनसेचा अपेक्षेनुसार विषय संपला आहे. या प्रभागात सात आणि बारा असे दोनच प्रभाग असून, प्रभाग सातमध्ये भाजपाचे एक नव्हे तर तीन आमदार आहेत. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर यांची प्रभागात प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी ती केवळ सोयीच्याच ठिकाणी होती का? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे. याचे कारण म्हणजे सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर या आमदारद्वयींची प्रतिष्ठा जणू त्यांच्या कुटुंबीयांमधील योगेश हिरे आणि गौरी अहेर आडके यांच्या पुरतीच सीमित होती.  फरांदे यांनी आग्रहाने उमेदवारी मिळवून दिलेल्या स्वाती भामरे विजयी झाल्या, परंतु शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना मात्र त्या रोखू शकल्या नाहीत. त्यामुळे तीन तीन भाजपा आमदार असलेल्या प्रभागात बोरस्ते निवडून आलेले हे भाजपाला वर्मी लागायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. बाकी प्रभाग १२ मध्ये भाजपाचे शिवाजी गांगुर्डे आणि प्रियंका घाटे हे दोघे निवडून येऊ शकले. अन्य दोन प्रभागांमध्ये कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील व समीर कांबळे हे विजयी झाले.
मतदारसंघावर प्रभुत्व नाही
एखाद्या विभागात किंवा तालुक्यात एक आमदार असला तर त्या संपूर्ण मतदारसंघावर त्यांचे प्रभुत्व मानले जाते, परंतु मध्य नाशिकमध्ये भाजपाचे तीन आमदार एकाच भागात असताना दोन प्रभागांवरही ताबा घेऊ शकले नाही, ही चूक कोणाची हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.  महात्मानगर ते मुंबई नाका या भागापर्यंत आजवर कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात मनसेचा प्रभाव राहिला आहे. या प्रभागात भाजपाचा जो प्रभाव वाढणे अपेक्षित होता. तो मात्र वाढला नाही. त्यामुळे पक्षातील मूळ इच्छुकांवर विश्वास न टाकता चार आयात उमेदवारांवरही निवडणूक लढली गेली आणि त्यात शिवाजी गांगुर्डे व प्रियंका घाटे या दोघांनी बाजी मारली. त्यामुळे हा प्रभाव भाजपाच की संबंधित उमेदवारांचा, अशी शंका घेण्यास जागा आहे.

Web Title: Three of the MLAs, only five seats ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.