सवदंगाव फाट्यावर दोन अपघातांत तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST2021-06-05T04:12:08+5:302021-06-05T04:12:08+5:30
अपघातातील मृतांमध्ये सुफयान अहमद मोहम्मद शाबान, जवेरिया फिरदौस सुफयान अहमद या पिता-पुत्रीसह उज्ज्वलाबाई संतोष बोराळे यांचा समावेश ...

सवदंगाव फाट्यावर दोन अपघातांत तीन ठार
अपघातातील मृतांमध्ये सुफयान अहमद मोहम्मद शाबान, जवेरिया फिरदौस सुफयान अहमद या पिता-पुत्रीसह उज्ज्वलाबाई संतोष बोराळे यांचा समावेश आहे. पवारवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास सुफयान अहमद मोहम्मद शाबान (३३), रा. अय्युबनगर (गुलशन ए मलिक) हे माळधे शिवारातील हाजी मोहम्मद अब्बास मशिदीचे इमाम होते. सकाळी फजरची नमाज पठण करून परतत असताना सवंदगाव फाटा येथे रस्ता ओलांडताना दुचाकीस (क्रमांक एम. एच.४१ एएन ४१८२) आयशर (क्रमांक जी.जे. १५ ए.व्ही.२२९८) यावरील अज्ञात चालकाने जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी आयशरच्या खाली दबली गेली होती. यात मौलाना सुफयान अहमद मोहम्मद शाबान यांचा मृत्यू झाला, तर जवेरिया फिरदौस सुफयान अहमद (९), स्वालेहा (७) व बुशरा या तिन्ही बहिणी जखमी झाल्या. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला. नागरिकांनी तिन्ही मुलींना जखमी अवस्थेत उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले. यापैकी जवेरिया फिरदौसचा दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मोहम्मद इरफान मोहम्मद शाबान (३५), रा.गुलशन ए मलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाझीम शेख करीत आहेत. दरम्यान, अपघातानंतर याच वाहनाने कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला कट मारल्याने ट्रालीचे नुकसान झाले. त्यामुळे घटनास्थळी रस्त्यावर सर्वत्र कांदे पडलेले होते. मात्र, संबंधित ट्रॅक्टरच्या चालकाने कुठलीही तक्रार दिली नाही. या तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान झाले.
इन्फो
ट्रकची दुचाकीला धडक
दुसरा अपघात याच ठिकाणी झाला. ट्रक (क्र. आरजे ०६ जीबी ७४७६) नाशिकहून धुळ्याकडे जात असताना समोर चालत असलेली (क्रमांक एम.एच ४१ ए.क्यू. ४०२७) या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात उज्ज्वलाबाई संतोष बोराळे (रा.बोराळे, ता.नांदगाव) यांचा मृत्यू झाला, तर जयदीप बोराळे हा जखमी झाला आहे. अपघातनंतर वाहन चालक फरार झाला आहे. संतोष तुकाराम बोराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
इन्फो
मुलीनेही सोडला प्राण
मौलाना सुफयान अहमद यांना तिन्ही मुलीच आहेत. शाळेला सुटी असल्याने ते अधूनमधून मुलींना नमाज पठण करण्यासाठी घेऊन जात असत. अपघातात मौलानांचा मृत्यू झाला. शुक्रवारच्या नमाजनंतर त्यांचा दफनविधी करण्यात आला. याचदरम्यान थोरली मुलगी जवेरिया फिरदौसने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ही खबर कब्रस्तानात धडकताच नातलगांनी एकच टाहो फोडला.
फोटो- ०४ सुफियान शाबान
===Photopath===
040621\04nsk_35_04062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०४ सुफीयान शाबान