जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांत तीन ठार
By Admin | Updated: July 28, 2014 00:47 IST2014-07-27T22:47:12+5:302014-07-28T00:47:31+5:30
दिंडोरीतील एकाचा समावेश

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांत तीन ठार
नाशिक : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ मखमलाबादरोड परिसरात राहणारा राहुल बाळू अहेर (२४) हा युवक शनिवारी दुपारच्या सुमारास याच परिसरातील देशी दारूच्या दुकानात बेशुद्धावस्थेत आढळून आला़ त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले़
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दुसरी घटना दिंडोरी येथे घडली़ विठ्ठल दत्तू ढोले (३७, रा़ रतगल्ली, दिंडोरी) याने आपल्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास स्वत:चा गळा चिरून घेतला़ त्यास उपचारासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयामार्फत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी दुपारी ढोले यांचा मृत्यू झाला़
या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे़ तिसरी घटना देवरगाव येथे घडली़ महेश चंदर वतार (३४, रा़ देवरगाव) यास राहत्या घराजवळ शुक्रवारी रात्री ९ वाजता सर्पदंश झाला़ त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात
दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़ (प्रतिनिधी)