तीन सोनसाखळी चोरट्यांना मोक्का
By Admin | Updated: February 4, 2017 23:40 IST2017-02-04T23:40:05+5:302017-02-04T23:40:26+5:30
पहिलीच कारवाई : गुन्हे शाखेची कामगिरी; १२ गुन्ह्यांची कबुली

तीन सोनसाखळी चोरट्यांना मोक्का
नाशिक : महिलांच्या गळ्यातील सौभाग्यलेणे, सोन्याची चेन हिसकावून प्रसंगी दुचाकीवरून ढकलून देत जखमी करणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे़ सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी प्रथमच तिघा संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम (मोक्का) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ या चोरट्यांनी शहरातून १२ महिलांच्या सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली होती़ पोलिसांनी मोक्कान्वये कारवाई केलेल्या सोनसाखळी चोरट्यांमध्ये बाळू चंदर जाधव (३२, रा. शांतीनगर, अंबड), किशोर अशोक धोत्रे (२९, रा. शांतीनगर, अंबड) व विनोद गंगाराम पवार (२९, रा. भगतसिंगनगर झोपडपट्टी, इंदिरानगर) या तिघांचा समावेश असून, हे तिघेही सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत़ न्यायालयात सुरू असलेल्या त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असून, शिक्षा होण्याचीही शक्यता आहे़ शहर गुन्हे शाखेने २ डिसेंबरला या तिघांना चेनस्रॅचिंगप्रकरणी अंबड पोलीस ठाणे हद्दीतून अटक केली होती़ पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता व सातपूर परिसरातून चोरलेल्या दुचाकींचा वापर चेनस्नॅचिंगसाठी केला होता़ या तिघांनी गंगापूर, अंबड, इंदिरानगर, भद्रकाली, मुंबई नाका, आडगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महिलांच्या गळ्यातील १२ सोनसाखळ्या खेचून नेल्या होत्या़ या तिघांकडून १२ सोनसाखळी चोरी व दोन दुचाकींच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून १६ तोळे सोने, दोन दुचाकी असा ४ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)