नाशिक : नगर जिल्ह्यात झालेल्या राज्य खो-खो स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या खो-खो संघात नाशिकच्या वृषाली भोये, कौसल्या पवार, सरिता दिवा यांना स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय नाशिकचीच सोनाली पवार हिची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
शेवगाव, नगर येथे आयोजित खो-खो स्पर्धेतून महाराष्ट्राचा खो-खो संघ जाहीर करण्यात आला आहे. हा संघ दिनांक २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान भुवनेश्वर ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत वृषाली भोये, कौसल्या पवार, सरिता दिवा या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याशिवाय सोनाली पवार हिची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. नाशिकच्या खो-खो प्रबोधिनीचे हे खेळाडू असून जिल्हा क्रीडा कार्यालय व नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन संचालित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सकाळ सायंकाळ नियमित सराव करतात. वृषाली भोये व कौसल्या पवार या श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण घेत असून सरिता दिवा व सोनाली पवार ही शासकीय कन्या विद्यालय येथे शिक्षण घेत आहे. संस्कृती नाशिक संस्थेच्या या खेळाडू असून त्यांना गीतांजली सावळे व उमेश आटवणे यांचे मार्गदर्शन लाभते. या खेळाडूंच्या निवडी व राज्य स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीबाबत नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक व जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
इन्फो
राष्ट्रीय स्पर्धेत एकाचवेळी तीन खेळाडू
नगर जिल्ह्यातील शेवगावला झालेल्या खो-खो स्पर्धेतून महाराष्ट्राचा खो-खो संघ जाहीर करण्यात आला आहे. हा संघ २२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच एकाच वेळी नाशिकचे तीन खेळाडू खेळताना दिसू शकणार आहेत.
फोटो
०९ खो-खो
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या वृषाली भोये, सरिता पवार, कौसल्या दिवा आणि सोनाली पवार.