मालेगावी तिघांचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: December 26, 2016 02:51 IST2016-12-26T02:50:45+5:302016-12-26T02:51:02+5:30
रोकडोबा तलाव : संगमेश्वरातील पाटीलवाड्यावर शोककळा

मालेगावी तिघांचा बुडून मृत्यू
मालेगाव/संगमेश्वर : मालेगाव सटाणा रस्त्यावरील शहरापासून ५ कि.मी. अंतरावरील रोकडोबा मंदिरालगतच्या तलावात तीन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून आज सायंकाळी अंत झाला. यामुळे संगमेश्वर परिसरावर शोककळा पसरली आहे.
संगमेश्वरातील पाटीलवाडा भागातील तरुण सायंकाळी क्रिकेट खेळण्यासाठी रोकडोबा परिसरात गेले होते. सायंकाळी हे तरुण नजीकच्या तलावात पोहण्यासाठी गेले. पीयूष चंद्रशेखर हिरे (१६) हा ११ वी विज्ञान वर्गात शिकणारा तरुण तलावातील गाळात पाय अडकून बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे मित्र निखिल पद्माकर हिरे (१९) व प्रशांत सुरेश हिरे (२३) यांनी तलावात उडी घेतली. तर काही मित्रांनी दोर टाकून वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांत त्यांना अपयश आल्याने इतर मित्रांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन जणांना बाहेर काढले. प्रथम त्यांना एका खाजगी रूग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेचे वृत्त संगमेश्वरात कळताच कुटुंबियांनी एकच टाहो फोडला.
तिन्ही मुले एकुलती
संगमेश्वरातील पाटीलवाडा भागात हे तीनही तरुण राहतात. मालेगाव मर्चण्ट बँकेचे कर्मचारी सुरेश निंबा हिरे यांचा मुलगा प्रशांत, संगमेश्वर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद्माकर यशवंत हिरे यांचा मुलगा निखिल व चंद्रशेखर बाबुलाल हिरे यांचा मुलगा पीयूष हे एकाच परिवारातील होते.तिघांचा एकाच वेळी अंत झाल्याने संगमेश्वर परिसरात शोककळा पसरली. हे तिघेही एकुलती एक मुले होती. रात्री त्यांचेवर श्रीरामनगर अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यमंत्री दाना भुसे तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार शेख रशीद यांंनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेवून सांत्वन केले.