तीन कोटींच्या खंडणीप्रकरणी तिघांना अटक
By Admin | Updated: August 14, 2016 02:41 IST2016-08-14T02:41:07+5:302016-08-14T02:41:53+5:30
भद्रकाली पोलिसांची कामगिरी : कंपनीत गुंतविलेले भांडवल वसुलीसाठी केले अपहरणं

तीन कोटींच्या खंडणीप्रकरणी तिघांना अटक
नाशिक : गुजरातमधील गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत गुंतविलेले भांडवल व त्यावरील कमिशन मिळत नसल्याने ते वसूल करण्यासाठी कंपनीतील कमिशन एजंटला चर्चेसाठी नाशकात बोलावून त्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून तीन कोटींची खंडणी मागणाऱ्या तिघा संशयितांच्या तावडीतून अपहृत युवकाची भद्रकाली पोलिसांनी सुखरूप सुटका केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शनिवारी (दि़१२) पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, या तिघा संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
उपायुक्त पाटील यांनी सांगितले की, गुजरातमधील मुकेश गणेशभाई कुकडीया (४८, रा़ गोपीनाथजीनगर, मोठा वारसा, सुरत) यांचा मुलगा दीपक कुकडीया हा जिग्नेश पानसरीया यांच्या गुजरातमधील विनटेक कंपनीत कमिशन एजंट म्हणून काम करतो़ दीपक याच्याशी ओळख झालेले संशयित ललित भानुभाई पटेल, हितेश अमृतलाल पटेल, संदीप गणेश पटेल (रा़ शंकरनगर, गंगापूररोड, नाशिक) यांनी कंपनीचे नाशिक शहरात गृहोपयोगी साहित्याचे दुकान सुरू करण्यासाठी नॉनरिफंडेबल तत्त्वावर दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली़ या गुंतवणुकीच्या बदल्यात संशयितांना कंपनीच्या वार्षिक नफ्यातून पाच टक्के कमिशन दिले जात होते़ मात्र तीन महिन्यांपासून कंपनीने संशयितांना पाच टक्के कमिशन दिले नाही़ त्यामुळे संशयित पटेल हे दीपक कुकडीया यास फोनवर धमकी देत होते़
कंपनीतील गुंतवणुकीचे पैसे परत मिळावे या मुद्द्यावरील चर्चेसाठी संशयितांनी कंपनीचे मालक जिग्नेश पानसरीया व सेल्समन दीपक कुकडीया यांना गुरुवारी (दि़११) नाशिकला बोलावून घेतले़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तपोवन रोडवरील मारुती वेफर्स येथील बैठकीनंतर संशयितांनी शस्त्राचा धाक दाखवून दीपकचे अपहरण करीत जोपर्यंत तीन कोटी रुपये परत मिळत नाही तोपर्यंत सोडणार नाही, असे सांगून घेऊन गेले़ यानंतर मुकेश कुकडीया यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना घटनेची माहिती दिली़ त्यांनी या प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष देऊन व्यूहरचना तयार केली़ भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, लवांड, पोलीस हवालदार सोमनाथ सातपुते, रियाज शेख, कैलास शिंदे, काळोगे, मोजाड, एजाज पठाण, संतोष उशीर, मिलिंद परदेशी, राकेश बनकर यांनी ही कामगिरी केली़ (प्रतिनिधी)