तीन नगरसेवकांसह माजी आमदारपुत्र रिंगणात
By Admin | Updated: February 14, 2017 01:39 IST2017-02-14T01:38:42+5:302017-02-14T01:39:02+5:30
चुरस : मतदारांकडून पक्षाऐवजी व्यक्तीला मिळेल महत्त्व

तीन नगरसेवकांसह माजी आमदारपुत्र रिंगणात
अझहर शेख : नाशिक
तीन विद्यमान नगरसेवक व एक आमदारपुत्र निवडणुकीच्या रिंगणारत असलेल्या प्रभाग क्रमांक १५मध्ये ‘कांटे की टक्कर’ पहावयास मिळणार आहे. तसा प्रभागाचा इतिहास पहाता येथील जनतेने अपक्ष व सेनेच्या उमेदवारांना दोनदा आणि मनसेला एकदा प्रतिनिधित्त्वाची संधी दिली आहे. त्यामुळे या प्रभागात कोणा एका पक्षाचे वर्चस्व अद्याप दिसू शकलेले नाही.
मुंबईनाका, भाभानगर, वडाळारोड, पखालरोड, काठे गल्ली, टाकळीरोड परिसर अशी मोठी व्याप्ती असलेल्या प्रभागात सध्या जोरदार लढत होणार आहे. कारण मनसेचे विद्यमान नगरसेवक गुलजार कोकणी यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच मनसेचे आमदार राहिलेले वसंत गिते यांनी भाजपात प्रवेश करून पुत्र प्रथमेशच्या हाती कमळ दिले आहे. यामुळे मनसेने गेल्या पंचवार्षिकमध्ये या प्रभागात पाडलेला प्रभाव यंदा कमी झाला असून, संदीप लेनकर यांच्या रूपाने एकमेव स्वीकृत नगरसेवक हे मनसेचे उमेदवार असून, अन्य दोन उमेदवार प्रभागात नवीन आहे. या पंचवार्षिकमध्ये पक्षाऐवजी व्यक्तीसापेक्ष निवडणुकीचे चित्र येथे पहावयास मिळू शकते. या प्रभागातील नागरिकांच्या मागास प्रवर्गातून (अ) मनसेच्या विद्यमान नगरसेवक राहिलेल्या अर्चना थोरात यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, त्या यंदा भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. सेनेच्या सीमा पवार व मनसेच्या लता काठे, कॉँग्रेसच्या प्रिया मुनशेट्टीवार हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहे. सर्वसाधारण खुल्या वर्गातून (ब) भाजपा, सेना, कॉँग्रेस, मनसेसह तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. ‘क’मधून एकूण सहा उमेदवार रिंगणात असून, कोकणी, गिते, मराठे, लेनकर यांच्यात प्रमुख लढत या गटातून होणार आहे. सचिन काठे हे एकमेव अपक्ष उमेदवार या गटातून नशीब अजमावत आहे. या गटात दोन किंबहुना तीन विद्यमान नगरसेवक व एक आमदारपुत्र परस्परविरोधी निवडणुकीच्या रिंगणात आहे.