तिसऱ्या सोमवारी मिनिटाला तीन बसेस

By Admin | Updated: August 9, 2014 00:50 IST2014-08-09T00:35:55+5:302014-08-09T00:50:11+5:30

ब्रह्मगिरी : खासगी वाहनांना प्रवेश बंद; एकूण ४६० बसेस धावणार

Three buses on the third Monday | तिसऱ्या सोमवारी मिनिटाला तीन बसेस

तिसऱ्या सोमवारी मिनिटाला तीन बसेस

नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारचे महत्त्व आणि ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वरसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ४६० बसेस धावणार असून, मिनिटाला तीन बस याप्रमाणे वाहतूक होईल. नित्याची वाहतूक कोंडी टाळून भाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचा प्रयत्न असेल, अशी माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.
ब्रह्मगिरी फेरीसाठी तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांची संख्या लाखांत असते. गेल्या वर्षी सुमारे पाच लाख भाविकांनी त्र्यंबकेश्वरला हजेरी लावली होती. यावेळी ही संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने वाहतूक, तसेच बंदोेबस्ताचेही नियोजन केले जात आहे. गेल्या काही वर्षांचा तिसऱ्या श्रावणी सोमवारचा अनुभव पाहता, भाविकांच्या सोयीसाठी महामंडळाच्या ४६० बसेस उपलब्ध केल्या आहेत. त्यात त्र्यंबकसाठी नाशिकहून २०९, नाशिकरोडहून ४०, निमाणीतून ३०, महामार्ग बसस्थानकातून २०, खंबाळे येथून २५, सातपूर येथून २५ असे नियोजन आहे. यासाठी महामंडळाचे २०० कर्मचारी तैनात आहेत. नाशिकमार्गे जाणाऱ्या बसेस मेळा बसस्थानकातून जाणार असल्याने येथून सायंकाळी ६ नंतर मिनिटाला तीन बसेस उपलब्ध असतील.
मात्र, ब्रह्मगिरीची फेरी आणि तिसरा श्रावणी सोमवार यानिमित्ताने भाविक खासगी वाहनांतून येतात. रस्त्यालगत वाहने लावून फेरीसाठी निघून जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे बसच्या अपेक्षित फेऱ्या पूर्ण होऊ शकत नाहीत. यंदा मात्र त्र्यंबक रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीची कोंडी टळेल आणि बसच्या माध्यमातून जास्त भाविकांच्या फेऱ्या होऊ शकतील, असे असले तरी प्रशासनाच्या वतीने यावेळीही त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three buses on the third Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.