वडाळा गावातील खून प्रकरणात मुख्य संशयितासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:12+5:302021-09-24T04:17:12+5:30
इंदिरानगर : वडाळागाव परिसरात दोन महिन्यांपूर्वी दिनेश गेहरू पाल याचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह अण्णा ...

वडाळा गावातील खून प्रकरणात मुख्य संशयितासह तिघांना अटक
इंदिरानगर : वडाळागाव परिसरात दोन महिन्यांपूर्वी दिनेश गेहरू पाल याचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह अण्णा भाऊ साठेनगर जवळील साळवे मळ्यातील पडिक विहिरीत फेकल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचा अखेर दोन महिन्यांनंतर उलगडा झाला असून, या प्रकरणातील मुख्य संशयित जाकीर पिरसाहब कोकणी (५७, रा, कोकणीपुरा, जुने नाशिक) यांच्यासह अशोक कुमार रामनिवास रॉय व राम नारायण सिंग कमला सिंग याना पोलिसांनी अटक केली आहे.
वडाळा परिसरातील अण्णा भाऊ साठे नगरजवळील निर्जन भागातील साळवे मळ्यातील पडिक विहिरीत दि. २४ जुलैला सकाळच्या सुमारास मृतदेह पाण्यावर तरंगताना शेतकऱ्यास आढळून आला होता. हा मृतदेह पूर्णता कुजलेला असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती; परंतु या घटनेत दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व मृतदेहाची दोन दिवसांत ओळख पटवून संबंधित मयत व्यक्ती दिनेश गेहरू पाल (३०, वडाळा रोड) हा जनावराच्या गोठ्यात काम करणारा कामगार मूळचा उत्तर प्रदेश, सोनभद्रा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला होता. या तपासात पोलीस पथकाने दोन महिन्यांपासून परिसरातील जनावरांच्या गोठ्यातील सर्व कामगार व संशयितांची चौकशी केली. यातून दिनेश पाल त्याच्या व्यसनामुळे कोणत्याही गोठ्यात जास्त दिवस काम करीत नसल्याचे समोर आले होते. परंतु ही घटना घडली तेव्हा तो वडाळा रोड रस्त्यावरील एका जनावरांच्या गोठ्यात काम करीत असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी येथील दोन कामगारांची कसून चौकशी केली. यात दोघे संशयित अशोक कुमार रामनिवास रॉय (४०, रा. वडाळा रोड, ) व राम नारायण सिंग कमलास सिंग (५३, रा. वडाळा रोड ) यांच्यासह गोठामालक जाकीर पिरसाहब कोकणी पाल याला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कामासाठी उठवण्यासाठी गेले होते. परंतु, पाल याने कामास जाण्यास नकार दिल्याने चा राग आल्याने त्या तिघांनी पालचा गळा दाबून खून केल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन कामगारांना चार दिवसकोठडी
पोलिसांनी गोठ्यातील दोन कामगारांना यापूर्वीच अटक करून न्यायालयत हजर केले असून न्यायालयाने त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुख्य संशयित जाकीर पिरसाहब कोकणी याला पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, प्रभाकर पवार, महेश जाधव, सागर परदेशी, मुश्रीफ शेख, जावेद खान, दत्तात्रय गवारे, सौरभ माळी, संजय चव्हाण यांच्या पथकाने गुरुवारी (दि.२३) सायंकाळी उशीरा अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.