तीन हजारांचे झाले ३२ हजार भाडे !

By Admin | Updated: December 3, 2015 23:59 IST2015-12-03T23:59:12+5:302015-12-03T23:59:37+5:30

पालिकेच्या गाळेधारकांना धक्का

Thousands of thousands of 32 thousand rent! | तीन हजारांचे झाले ३२ हजार भाडे !

तीन हजारांचे झाले ३२ हजार भाडे !

नाशिक : महापालिकेने चार हजार रुपये भाडे असणाऱ्या गाळेधारकांना चाळीस हजार, तर तीन हजार रुपये भाडे असणाऱ्यांना चक्क ३२ हजार रुपये भाडे ठरविले असून, संबंधितांना पूर्वलक्षी प्रभावाने वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मासिक भाड्याचे दर बघून पोटात गोळा उभा उठलेल्या गाळेधारकांना थकबाकीची रक्कम लक्षावधी रुपये पाहून डोळे फिरायची वेळ आली आहे.
महापालिकेने गाळेधारकांची मुदत संपल्यानंतर वाढ करण्यासाठी पूर्वी दहा ते पंधरा टक्के वाढीचे धोरण बदलले. इतकेच नव्हे तर मिळकत खरेदी विक्रीसाठी आधार असलेले जमिनीचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडिरेकनरशी जोडले. त्यामुळे पूर्वीच्या गाळेधारकांना भाडेवाडीचा दणका बसला आहे. विशेष म्हणजे जमीन मूल्याचा आणि भाडे मूल्याची सांगड घालण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. शिवाजीरोडवरील रेडिरेकनरचा दर ७० रुपये चौरस फूट मान्य करण्यात आला असून, दुसरीकडे मखमलाबाद नाका येथील जुन्या पालिका विभागीय कार्यालयातील पालिका मार्केटसाठी ९७ रुपये प्रति चौरस फूट दर लागू करण्यात आल्याने शिवाजीरोड येथील गाळेधारकांच्या जवळजवळ दुप्पट भाडे मखमलाबाद नाका येथील गाळेधारकांना लागू करण्यात आले. इतकेच नव्हे तर मखमलाबाद नाका येथील गाळेधारकांना प्रत्येकी प्रचलित दराप्रमाणे मासिक भाडे भरले असतानादेखील सुधारित रेडिरेकनरच्या दराप्रमाणे २०१४ पासून भाडे आकारणी करण्यासाठी सात लाख रुपये भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सातपूर खोका मार्केट येथील गाळेधारकांना पाचशे रुपयांचे भाडे असताना ते वाढविण्यात आल्याने तेथील विक्रेत्यांना त्यांना एक लाख रुपये भरण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे नाशिक शहरातील पालिका बाजारांमधील गाळेधारकांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्या भेटी घेतल्यानंतर सर्व गटनेत्यांच्या भेटी घेण्यास प्रारंभ झाला आहे. येत्या मासिक महासभेत हा विषय मांडण्याचे आश्वासन गटनेते देत असल्याचे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of thousands of 32 thousand rent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.