सुटीतही भोजनावर हजारो क्विंटल धान्य?
By Admin | Updated: August 18, 2015 00:31 IST2015-08-18T00:30:36+5:302015-08-18T00:31:16+5:30
आश्चर्य ! : एप्रिल-मेमध्ये झाला पुरवठा

सुटीतही भोजनावर हजारो क्विंटल धान्य?
नाशिक : शासकीय कारभार नेमका कोणत्या दिशेने व कसा सुरू असतो, याचे अनेक नमुनेदार आणि मासलेवाईक प्रसंग या ना त्या निमित्ताने समोर येत असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनावरील एप्रिल-मेदरम्यान करण्यात आलेल्या धान्य पुरवठ्याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.
वास्तविक पाहता एप्रिल- मे हा विद्यार्थ्यांच्या उन्हाळ सुटीचा कार्यकाळ असतो. त्या काळातही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हजारो क्विंटल शिधा आणि धान्याचा पुरवठा करण्यात आल्याने सुटीत हे मध्यान्ह भोजन शिजविले कोणी आणि खाल्ले कोणी? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्राथमिक शाळांना मध्यान्ह भोजनासाठी विविध प्रकारच्या नऊ धान्य व मसाल्यांचा पुरवठा करण्यात येतो. त्यात हळद, सोयाबीन तेल, मोहरी, जिरे, कांदा मसाला, मीठ, वाटाणा, चवळी आदि प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. एप्रिल, मे महिन्यात या नऊ प्रकारच्या धान्य व साहित्याचा पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी ५,३७३ क्ंिवटल, तर सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ३,८९४ क्ंिवटल धान्याचा पुरवठा करण्यात आल्याचे समजते. तसेच जून व जुलै दरम्यान पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी ४,९१० व ३,३२४ क्ंिवटल नऊ प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला.
तसे पाहिले तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना एप्रिल व मे च्या दरम्यान उन्हाळी सुटी होती, तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नियमित शाळा सुरू झाल्यामुळे एप्रिल व मे दरम्यान करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाचे धान्य व साहित्य पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)