हजारो वनवासींचे तीर्थस्नान

By Admin | Updated: September 15, 2015 23:36 IST2015-09-15T23:19:17+5:302015-09-15T23:36:56+5:30

कपिला-गोदा संगम : भव्य शोभायात्रेने वेधले नाशिककरांचे लक्ष

Thousands of pilgrims | हजारो वनवासींचे तीर्थस्नान

हजारो वनवासींचे तीर्थस्नान

नाशिक : जातीपातीचे बंध तोडून अखिल हिंदू एक व्हावा, समरसता प्रस्थापित व्हावी तसेच धर्मावरील लोकश्रद्धा अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने गोदाघाटावरील कपिला-गोदा संगमावर हजारो हिंदू वनवासी बांधवांनी तीर्थस्नान केले. यावेळी सुरत येथील जगद्गुरू वल्लभाचार्य यांच्या हस्ते तीर्थपूजन करण्यात आले.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण विभागाच्या वतीने पंचवटीतील हिरे महाविद्यालयात वनवासी बांधवांच्या दोनदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दशकात हिंदू धर्म सोडून अन्य धर्मांत गेलेल्या वनवासी बांधवांना ‘घरवापसी’ कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मात आणण्याचे काम धर्मजागरण विभागाकडून सुरू आहे. या संमेलनानिमित्त अशा धर्मांतरित वनवासींसह देशभरातील हजारो वनवासी बंधू-भगिनी नाशिकमध्ये एकत्र आले आहेत. या बांधवांनी आज सकाळी तपोवनातील कपिला-गोदा संगमावर मिरवणुकीद्वारे येऊन स्नानाची पर्वणी साधली.
सकाळी ९ वाजता जगद्गुरू वल्लभाचार्य महाराजांच्या नेतृत्वाखाली या वनवासी बांधवांची शोभायात्रा काढण्यात आली. रामनामाचा गजर, भारत मातेचा जयजयकार करीत ही मिरवणूक पंचवटी महाविद्यालयापासून तपोवनमार्गे कपिला-गोदा संगमावर दाखल झाली. मिरवणुकीत हुतात्मा शिरीषकुमार मर्दानी खेळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दांडपट्ट्याच्या मर्दानी खेळाचे थरारक दर्शन घडवले. लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे लेजीम पथक व रामराज्य ढोलपथकही मिरवणुकीत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.