अवयवदानाचे अर्ज हजारो; मात्र, ५ वर्षांत अवयवदान केवळ २६ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:08+5:302021-08-13T04:19:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात अवयव दानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असल्याने गत ५ वर्षांत अवयवदानाचे हजारो अर्ज ...

Thousands of organ donation applications; However, only 26 organ donations in 5 years! | अवयवदानाचे अर्ज हजारो; मात्र, ५ वर्षांत अवयवदान केवळ २६ !

अवयवदानाचे अर्ज हजारो; मात्र, ५ वर्षांत अवयवदान केवळ २६ !

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्ह्यात अवयव दानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असल्याने गत ५ वर्षांत अवयवदानाचे हजारो अर्ज भरले गेले आहेत. ते अर्ज भरणाऱ्या शेकडो नागरिकांचे मृत्यूदेखील झाले. मात्र कुटुंबीयांनी अवयवदानास नकार दिल्याने आतापर्यंत प्रत्यक्षात केवळ २६ नागरिकांचेच मृत्युपश्चात अवयवदान शक्य झाले आहे.

अवयवदानासंबंधीचा कायदा अडीच दशकांपूर्वीच झाला आहे. त्यातही गत दशकापासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात अवयवदानाची चळवळ विविध संस्थांच्या माध्यमातून राबविली जात आहे. त्यामुळे अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचल्याने जिल्ह्यात अवयवदानाचे अर्ज भरणाऱ्यांची संख्या हजारोंहून अधिक आहे. मात्र, प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती ब्रेनडेड झाल्यास किंवा मृत्युपश्चात अवयवदान करणाऱ्यांची संख्या त्या तुलनेत अत्यल्प म्हणजे केवळ २६ आहे. अवयवदानाचा अर्ज भरलेल्या व्यक्तीचे अवयवदान करण्यास त्यांचे कुटुंबीयच नकार देण्याचे प्रकार घडतात. त्यामागे गैरसमजुती, भीती, अंधश्रद्धा हेच मुख्य कारण आहे. अवयवदानातली अन्य समस्या ही हृदय, स्वादुपिंड व यकृत निकामी झाल्याने अकाली मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप जास्त असणे आहे. रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इतर लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलेल्या व ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचेच हे अवयव उपयोगात आणता येतात. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत दुरुस्त होऊ न शकणारा दोष निर्माण झाल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्यास, परंतु हृदय काम करीत असल्यास त्या व्यक्तीस ‘ब्रेन डेड’ घोषित केले जाते. अशा वेळेस त्या व्यक्तीचे अवयव व्यवस्थित काम करत असतात व दानासाठी ते उपयुक्त ठरू शकतात. तसेच मृत्यू रुग्णालयात झालेला असल्याने डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना वेळीच जाणीव करून दिल्यास अवयवदानाच्या संख्येत वाढ होणे शक्य असते.

इन्फो

देशात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प

जगाच्या तुलनेत भारतात अवयवदानाचे प्रमाणदेखील खूपच कमी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, निरनिराळ्या देशांतील अवयवदानाचे प्रमाण दर दहा लाख लोकांमागे स्पेनमध्ये ४१, इंग्लंडमध्ये २९, अमेरिकेत २६ तर कॅनडात १५ इतके आहे, तर भारतात हेच प्रमाण १ टक्क्यापेक्षाही कमी केवळ ०.८ टक्के इतकेच आहे. भारतात अपघातात ब्रेन डेड झालेल्या व्यक्तींचे अवयवदान घडवून आणले तरी हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

इन्फाे

दहा गरजूंना संजीवनी

देहदान व अवयवदान या दोन भिन्न प्रक्रिया आहेत. हृदय, फुप्फुस, हाडांच्या पेशी, शिरा, लहान आतडे, स्वादुपिंड, यकृत, मूत्रपिंड, डोळे, त्वचा हे सर्व अवयव दान करता येतात. त्यातील स्वादुपिंड, यकृत यांचा काही भाग व एक मूत्रपिंड जिवंतपणीही दान करता येते. एका अवयवदात्यामुळे साधारण दहा गरजू व्यक्तींना संजीवनी मिळू शकते आणि ही संजीवनी प्रत्यक्षात गरजूंपर्यंत पोहोचवणारा मुख्य दुवा असतो मृत व्यक्तीचा कुटुंबीय. त्याशिवाय इतर कोणत्याही कारणाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आणि त्या व्यक्तीने अर्ज भरलेला नसला तरी नेत्रदान व त्वचादानही करता येते.

कोट

विविध संस्था, सामाजिक मंडळांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन अर्ज भरणाऱ्यांची संख्या हजारो आहे. मात्र, गत वर्षात तर केवळ दोघांचेच अवयवदान झाले आहे. प्रत्यक्षात संबंधिताचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय अवयवदानास नकार देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांनी संमती देऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनीही ब्रेनडेड रुग्णांच्या कुटुंबीयांचे योग्य समुपदेशन करण्याची गरज आहे.

डॉ. संजय रकिबे, समन्वयक, प्रादेशिक अवयव दान समिती

---------------

आमच्या संस्थेकडे गत आठ वर्षांत १४५२ रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्यात १२ नागरिकांनी नेत्रदान, चौघांनी देहदान तर एका व्यक्तीने अवयवदान केले आहे. आमच्या संस्थेसह नाशिक सायक्लिस्टच्या माध्यमातूनही अवयवदानाबाबत जनजागृती घडवून आणण्यावर भर देत आहे

- राजेंद्र वानखेडे, संस्थापक अध्यक्ष, मानवता हेल्प फाउंडेशन

Web Title: Thousands of organ donation applications; However, only 26 organ donations in 5 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.