हजारो किलो गुलाल बाजारात

By Admin | Updated: May 16, 2014 00:26 IST2014-05-16T00:23:52+5:302014-05-16T00:26:02+5:30

विजयाचे प्रतीक : समर्थकांकडून होते मुक्त उधळण

Thousands of gullets in the market | हजारो किलो गुलाल बाजारात

हजारो किलो गुलाल बाजारात

विजयाचे प्रतीक : समर्थकांकडून होते मुक्त उधळण
नाशिक : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या दुपारपर्यंत जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांकडून विजयाचे प्रतीक म्हणून गुलालाची मुक्त उधळण केली जाणार, हे गृहीत धरून बाजारात हजारो किलो गुलाल दाखल झाला आहे.
नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या २४ एप्रिल रोजी मतदान झाले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व जिल्‘ाचे पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे हेमंत गोडसे, मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांच्यासह अन्य उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत याच तिघांमध्ये झाली. विशेषत: अखेरपर्यंत ही लढत अटीतटीची झाल्याने कोणाच्याही बाजूने निकाल झुकू शकतो. त्यातच यंदा गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याने त्या-त्या पक्षाच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता लागून आहे.
निवडणुकीचा निकाल उद्या सकाळपासून यायला सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत पूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता असल्याने विजेत्या उमेदवाराच्या समर्थकांकडून गुलालाची मुक्त उधळण होणार आहे. तसेच उमेदवाराची शहरातून विजयी मिरवणूकही काढली जाणार यात गुलालाचा होणारा मोठ्या प्रमाणातील वापर लक्षात घेऊन शहरातील गुलालाच्या व्यापार्‍यांकडून हजारो किलो गुलाल बाजारात आणला आहे. कोण विजयी अन् कोण पराभूत होणार याचा अंदाज समर्थक कार्यकर्त्यांना येतो आणि ते विजयोत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागतात. त्यासाठी सर्वात आधी गुलालाची खरेदी होत असते.
शहरातील गुलाल व्यापार्‍यांनी निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शंभर ते सव्वाशे गुलालाच्या गोण्या आणल्या असून, मागणीप्रमाणे किरकोळ विके्रत्यांकडे त्या वितरित केल्या जातील. विशेषत: उद्या दुपारनंतर गुलालाची मागणी वाढेल असा अंदाज आहे. सध्या ३० ते ४० रुपये प्रतिकिलो गुलालाचा दर असून, एक गोणी २० किलोची असते. मिरवणुकांसाठी गुलालाच्या गोण्याच खरेदी केल्या जात असल्याने हजारो किलो गुलालाची उधळण उद्या होणार, एवढे मात्र नक्की.

गुलालात भेसळीची शक्यता
मातीपासून बनविण्यात आलेल्या गुलालामुळे शरीराला कुठलीही हानी नाही वा डोळ्यात गेल्यास फारशी इजा होत नाही; परंतु रांगोळीमध्ये मिसळून तयार करण्यात आलेला गुलाल डोळ्यात गेल्यास गंभीर स्वरूपाची इजा होऊ शकते. उद्या गुलालास अधिक मागणी राहणार असल्याने काही विक्रेत्यांकडून गुलालात भेसळ करून विक्री होण्याची शक्यता आहे.

गोण्यांचीच होते विक्री
निवडणुकीची मिरवणूक म्हटली की गुलालाच्या गोण्यांचीच खरेदी कार्यकर्त्यांकडून होत असते. त्यामुळे किमान ५० गोण्या आणल्या आहेत. याप्रमाणे शहरात किमान सव्वाशे गोण्या व्यापार्‍यांकडे आहेत. - अजिंक्य जैन, गुलाल व्यापारी.

Web Title: Thousands of gullets in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.