वणी : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे २०१६ साली आॅनलाइन बुकिंग केलेले एक हजाराचे नाणे अखेर ३४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्राप्त झाले आहे. हौसेपायी सदर नाणे ३६०० रु पयांना एका व्यावसायिकाने खरेदी केले आहे. येथील उदय बोथरा यांना नाणी जमा करण्याचा छंद आहे. सन २०१५ साली भारत सरकारने एक हजार रु पयांचे नाणे सार्वजनिक केले. मर्यादित स्वरूपाचे नाणे असल्यामुळे अनेक नाणेप्रेमींनी आॅनलाइन बुकिंग केले होते. त्यात उदय बोथरा यांनी डिसेंबर २०१६ साली मुंबईच्या रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे हजाराचे नाणे मिळावे यासाठी आॅनलाइन बुकिंग केली होती. एक हजाराच्या नाण्यासाठी ३६०० रु पये जमा करण्यास त्यांना सूचित करण्यात आले. ही कार्यवाही त्यांनी पूर्ण केली. दरम्यान १५ आॅक्टोबर २०१९ रोजी त्यांना हे एक हजाराचे नाणे मिळाले. ८० टक्के चांदी व २० टक्के कॉपर धातूचे हे नाणे असून, त्याचे वजन ३५ ग्रॅम आहे. हे हजाराचे नाणे पाहण्यासाठी कुतुहुलापोटी अनेकांनी बोथरा यांच्याकडे गर्दी केली होती. तर अनेकांनी हाताळत सेल्फी घेत नाणे घेण्याचा अनुभव घेतला.
दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाले हजाराचं नाणं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 17:04 IST