लोकसहभागातून काढली काटेरी झुडपे
By Admin | Updated: September 28, 2014 22:39 IST2014-09-28T22:39:09+5:302014-09-28T22:39:27+5:30
लोकसहभागातून काढली काटेरी झुडपे

लोकसहभागातून काढली काटेरी झुडपे
मुंजवाड : मुंजवाड ते चौंधाणे रस्त्यावर वाढलेल्या बाभळीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यववहार करूनही त्याची दखल न घेतल्याने मुंजवाड येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी जमा करून रस्त्यावरील काटेरी झुडपे काढली.
मुंजवाड ते चौंधाणे दरम्यान तरसाळी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात दुतर्फा काटेरी झुडपांचे अतिक्रमण झाले होते. या ठिकाणी रस्त्यावर वळण असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत. त्यात डांगसौंदाणे येथील निंबा त्र्यंबक सोनवणे यांना जीव गमवावा लागला तर त्यांच्या पत्नीला अपंगत्व आले.
मुंजवाड येथील पाडगण वस्तीवरील यश जाधव या चौथीच्या विद्यार्थ्याला वाहनातून उतरत असताना समोरून आलेल्या वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी केले. सुदैवाने त्याचे प्राण वाचले; मात्र त्यालाही अपंगत्व आले आहे. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला लेखीपत्र देऊनही दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी वर्गणी जमा करून जेसीबी लावून या मार्गावरील काटेरी बाभळी काढल्या. (वार्ताहर)