डोक्यात दगड टाकून तेरावर्षीय मुलाचा खून
By Admin | Updated: June 21, 2015 23:58 IST2015-06-21T23:57:30+5:302015-06-21T23:58:00+5:30
दिव्यदान हॉस्टेल आवारातील घटना : खुनाचा गुन्हा

डोक्यात दगड टाकून तेरावर्षीय मुलाचा खून
नाशिक : शहरात खुनाची मालिका अद्याप सुरूच असून, गंगापूररोडवरील दिव्यदान हॉस्टेलच्या आवारात तेरावर्षीय मुलाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचा प्रकार रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला़ खून झालेल्या मुलाचे नाव गोलू ऊर्फ विशाल शालिग्राम भालेराव (१३) असे असून, तो आसारामबापू आश्रमाजवळील शिंदे चाळ येथील रहिवासी आहे़ शनिवारी दुपारपासून हा मुलगा घरातून निघून गेलेला होता़ दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या भांडणातून हा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़
रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील दिव्यदान हॉस्टेलचे फादर थॉमस फ्रान्सिस चालीसेरी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फोन करून हॉस्टेलमधील एका झाडाखाली मुलाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली़ त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली. अंगात लाल रंगाचा टी-शर्ट व अर्धनग्न अवस्थेत या मुलाचा मृतदेह पालथा पडल्याचे दिसून आले़ या मुलाच्या डोक्यावरील जखमांवरून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला़ ओळख न पटल्याने पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला़
खून झालेल्या या मुलाची ओळख दुपारनंतर पटली व त्याचे नाव गोलू ऊर्फ विशाल शालिग्राम भालेराव असे असल्याचे समोर आले़ आसारामबापू आश्रमाजवळील शिंदे चाळीत राहणारा विशाल शनिवारी दुपारपासून घरातून निघून गेला होता़ तसेच दोन दिवसांपूर्वी विशालचा काही मुलांशी वाद झाल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली़ या प्रकरणी शालिग्राम भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एस़जगनाथन, पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, एन. अंबिका, श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त विजय चव्हाण, सचिन गोरे यांनी भेट देऊन गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर काळे यांनी तपासाच्या सूचना दिल्या़ रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी खुनातील संशयितांचा शोध घेत होते़ (प्रतिनिधी)