तीन तासांत तेरा हजारांचा दंड
By Admin | Updated: September 30, 2016 01:57 IST2016-09-30T01:51:13+5:302016-09-30T01:57:46+5:30
सहा ठिकाणी नाकाबंदी : १२९ दुचाकीस्वारांवर कारवाई

तीन तासांत तेरा हजारांचा दंड
नाशिक : वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणे, बेदरकारपणे दुचाकी चालविणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत एकूण तेरा हजारांचा दंड वसूल केला आहे.
भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापूर या सर्व
पोलीस ठाण्यांमधील पोलीस कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथके तयार करून सरकारवाडा व गंगापूर
पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान बेशिस्तपणे दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी एकूण १२९ दुचाकीस्वारांवर कारवाई करत सुमारे तेरा हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच पोलिसांनी कॉलेजरोड परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या टवाळखोरांवरही कारवाई करत मुंबई पोलीस अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहे.
एकूण ४२ टवाळखोरांवर यावेळी कारवाई करण्यात आली. कॉलेजरोड भागात वाढता रोडरोमियो व टवाळखोरांच्या उपद्रवाने नागरिक व विद्यार्थी हैराण झाले होते. पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी सकाळी तीन तास मोहीम राबविली. (प्रतिनिधी)