तेरा विंधन विहिरी कोरड्या

By Admin | Updated: June 28, 2016 00:49 IST2016-06-28T00:42:32+5:302016-06-28T00:49:56+5:30

शिवसेनेचे स्टिंग आॅपरेशन : सटाणा नगराध्यक्षांचा दावा ठरला फोल

Thirteen dams dry well | तेरा विंधन विहिरी कोरड्या

तेरा विंधन विहिरी कोरड्या

सटाणा : शहर आज भीषण पाणी टंचाईला सामोरे जात आहे. काही भागात आठ दिवसाआड तर काही भागात थेंबभरही पाणी येत नाही, अशी अवस्था असताना दुसरीकडे मात्र सोळा विंधन विहिरी करून शहराची पाणीटंचाई दूर केल्याचा दावा नगराध्यक्ष करत आहेत. परंतु हा दावा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख शरद शेवाळे यांनी सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनने फोल ठरवला. शिवसेनेच्या या स्टिंगमध्ये तब्बल तेरा विंधन विहिरी कोरड्या ठाक निघाल्या, तर काही ठिकाणी विंधन विहीरच केली नसल्याचे आढळून आले.
सटाणा शहरासाठी ठोस पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे शहरवासीयांसाठी पाणीटंचाई ही पाचवीला पूजलेली आहे. शहरात नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पालिकेला महसूलही चांगला मिळतो. परंतु बहुतांश नवीन नागरी वसाहतींपर्यंत पालिकेचे नळ पोहचले पण पाण्याची प्रतीक्षा कायम आहे.
आजच्या घडीला शहरात आठ दिवसआड पाणी येते, काही ठिकाणी तर येतच नाही, अशी भीषण परिस्थिती असताना टंचाई निवारण करण्यासाठी पालिका प्रशासनाने आमदार निधीमधून सोळा विंधन विहिरींचे काम घेतली होते. दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्षांनी या सोळा विंधन विहिरींना मुबलक पाणी आहे, त्यांना जलपरी बसवून ठिकठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत करून टंचाई दूर केल्याचा दावा माध्यमांद्वारे केला होता. याबाबत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, शहर प्रमुख शरद शेवाळे यांनी सोमवारी स्टिंग आॅपरेशन केले. प्रथम शिवसेनेच्या टीमने मुल्लावाड्यात फेरफटका मारला. त्याठिकाणी एका विंधन विहिरीला पाणी लागले तर दुसरी कोरडी ठाक निघाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. आंबेडकरनगर व अहल्याबाई चौकात तर विंधन विहीर आढळून आली नसल्याचे नागरिकांच्या हवाल्याने सांगितले. सुभाष ततार चौकात तर या टीमला खळबळजनक प्रकार निदर्शनास आला.
याठिकाणी दोनशे फुट पर्यंत खोल विंधन विहीर करण्यात आली. मात्र पाणी न लागल्यामुळे नागरिकांनी साडे तीनशे फुटापर्यंत खोल करण्याची मागणी केली त्याला संबंधित ठेकेदाराने नकार देत दीडशे फुटासाठी वर्गणी गोळा करण्याचा पर्याय दिला. त्यानुसार प्रतिकुटुंब पाचशे रु पये गोळा केल्याचे तेथील नागरिक बिंदू शर्मा यांनी सांगितले. मात्र तरी फुपाटेच निघाल्याचे आढळून आले. त्यानंतर भोईगल्ली, सोनारगल्ली, दीपनगर, मराठी शाळा, कचेरीरोड, गणेशनगर येथे सर्वच ठिकाणच्या विंधन विहिरीत फुपाटेच निघाल्याचा गंभीर प्रकार समोर आला.
सुकेडनाला आदिवासी वस्तीत तर अनेकवेळा विंधन विहिरी केल्या परंतु त्या बिले काढण्यापुरत्याच. विंधन विहीर होते मात्र खाली वाळू असल्याचे कारण सांगून आम्हाला तहानलेलेच ठेवल्याचे आदिवासी बांधवानी सांगितले. सेनेच्या टीमने सोमवारी दिवसभर केलेल्या या स्टिंग मुळे पालिका प्रशासनाचा भंडा फोड होऊन नगराध्यक्षांचा दावा फोल ठरवला आहे. (वार्ताहर)

Web Title: Thirteen dams dry well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.