युतीच्या मेळाव्यात तिसऱ्या पॅनलची घोषणा
By Admin | Updated: June 23, 2015 00:48 IST2015-06-23T00:47:41+5:302015-06-23T00:48:36+5:30
युतीच्या मेळाव्यात तिसऱ्या पॅनलची घोषणा

युतीच्या मेळाव्यात तिसऱ्या पॅनलची घोषणा
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीने तिसरे पॅनलकडून निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली असून, काल (दि.२२) झालेल्या मेळाव्यात तिसरे पॅनल निर्मितीबाबत उपस्थित नेत्यांनी सूतोवाच केले. दरम्यान, काल एकूण ३७ उमेदवारांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात माजी जि. प. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह सुरेश गंंगापुत्रे, दत्तू म्हैसधुणे, वसंत अरिंगळे, सुनील खोडे, किसन मेढे, रावसाहेब कोशिरे, बाळासाहेब पालवे, रमेश आवटे, प्रल्हाद काकड, भाऊसाहेब खांडबहाले, प्रकाश आल्हाटे, कांतीलाल लोढा, अनिल बूब, जगदीश अपसुंदे, अशोक पाळदे, रामदास धात्रक, राजाराम फडोळ, ज्ञानेश्वर पाळदे आदिंचा समावेश आहे. उद्या (दि.२३) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, युतीसह शेतकरी विकास पॅनलचे पदाधिकारी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. शिवसेना--भाजपा युतीच्या वतीने त्र्यंबकेश्वर रोडवरील दाते लॉन्स येथे युतीच्या समर्थकांचा व इच्छुकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार हरिश्चंद्र चव्हाण होते. बाजार समितीतील गेल्या २० वर्षांतील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि कामगार व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना-भाजपाच्या वतीने युतीचे तिसरे पॅनल तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी खासदार चव्हाण यांनी सांगितले. मेळाव्यात प्रास्ताविक नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यास आमदार बाळासाहेब सानप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुनील आडके, शांताराम मुळाणे, मनसे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे, माजी नगरसेवक मंदा दातीर, मधुकर खांडबहाले, जगन आगळे, समाधान बोडके, प्रकाश म्हस्के आदिंसह युतीचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या शुक्रवारी (दि.२६) माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा अंबोली (त्र्यंबकेशवर) येथे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मतदारांचा मेळावा ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)