यजमानांना तिसऱ्या क्रमांकाची आशा; गोल्डन बुट आणि बॉलची चर्चा

By Admin | Updated: July 12, 2014 00:26 IST2014-07-11T22:54:02+5:302014-07-12T00:26:11+5:30

यजमानांना तिसऱ्या क्रमांकाची आशा; गोल्डन बुट आणि बॉलची चर्चा

The third largest hope for the hosts; Golden boot and ball talk | यजमानांना तिसऱ्या क्रमांकाची आशा; गोल्डन बुट आणि बॉलची चर्चा

यजमानांना तिसऱ्या क्रमांकाची आशा; गोल्डन बुट आणि बॉलची चर्चा

विश्वचषकाच्या अंतिम चरणात दाखल झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम मुकाबल्याआधी तिसऱ्या क्रमांकासाठीची लढत होत आहे. यामध्ये उपउपांत्य फेरीत अगदी घायाळ झालेल्या यजमान ब्राझीलला आत्तापर्यंतच्या फुटबॉलच्या इतिहासातील अत्यंत लाजीरवाणा पराभव विसरून पुन्हा स्वत:साठी आणि आपल्या असंख्य पाठीराख्यांसाठी पुन्हा जोमाने सज्ज होऊन निदान तिसरा क्रमांक मिळवून आपल्या चाहत्यांचे अनावर झालेले अश्रू थोड्याफार प्रमाणात का होईना पुसण्याचे काम करावे लागणार आहे.
यजमना ब्राझील आणि नेदरलॅन्ड या दोन उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघादरम्यान ही तिसऱ्या क्रमांकासाठीची लढत होत आहे. कोणत्याही स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर अंतिम फेरी चुकल्याचे दु:ख असल्यामुळे त्यानंतर खेळाव्या लागणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीसाठी नेहमीसारखा उत्साह दिसून येत नाही. मात्र फुटबॉल विश्वचषकामध्ये जगभरातील २०९ देशांमधून पात्र ठरून ३२ संघांत स्थान मिळणेच अतिमहत्त्वाचे मानले जाते आणि या ३२ संघांमध्ये तिसरा क्रमांक मिळवणे हीदेखील फार मोठी कामगिरी मानली जाते. अर्थात ब्राझीलसारख्या संघाने पाच विजेतेपद मिळविले आहे तर नेदरलॅन्डच्या संघाने अद्याप विजेतेपद मिळविले नसले तरीही तीन वेळा अंतिम फेरी गाठून तीन उपविजेतेपद मिळविले आहे. त्यामुळे तिसरा क्रमांक मिळविणे ही काही ब्राझील आणि नेदरलॅन्डसाठीही वेगळी अ‍ॅचिव्हमेंट असणार नाही. मात्र ब्राझीलसाठी यावेळचे हे तिसऱ्या क्रमांकाचे ध्येय आता महत्त्वाचे झाले आहे. कारण या स्पर्धेचा यजमान असणाऱ्या ब्राझीलमध्ये या विश्वचषकाच्या आयोजनावरून बरेच वाद झाले आहेत आणि या वादावर कोठेतरी फुंकर घालण्यासाठी ब्राझीलला या विश्वचषकाचे विजेतेपद मिळविणे गरजेचे होते. मात्र जर्मनीने त्यांचे हे मनसुबे धुळीस मिळविले. त्यामुळे विजेतेपद नाही तर निदान तिसरा क्रमांक मिळवून काही प्रमाणात का होईना याची थोडीफार भरपाई ब्राझीलला करावीच लागणार आहे आणि त्यामुळे जरी आपला अगदी दारुण पराभव झाला असला तरी आम्ही पुन्हा उभारी घेऊ शकतो, असा विश्वास त्यांना आपल्या समर्थकांना देण्यासाठीही या विश्वचषकातील त्यांची शेवटची लढाई जिंकावी लागणार आहे.
यजमानांना कायमच फायदा : खरेतर विश्वचषकाच्या आत्तापर्यंतच्या ८४ वर्षांच्या स्पर्धांवर नजर टाकल्यास यजमान संघांना कायमच फायदा झालेला आहे. या आधीच्या १९ विश्वचषकांवर नजर टाकल्यास यजमान संघांनी १९ पैकी सहा यजमान संघांनी विजेतेपद मिळविलेले आहे, दोन यजमान संघांना उपविजेतेपद मिळालेले आहे, तर तीन यजमान संघांनी तिसरा क्रमांक मिळविलेला आहे आणि एका संघाला चवथा क्रमांक मिळाला आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत केवळ आठच संघांनी विश्वविजेतेपद मिळविले आहे आणि या आठपैकी सहा संघांनी यजमान असतानाच हे विश्वविजेतेपद मिळविलेले आहे, यामुळेच यजमान होण्याचे महत्त्व दिसून येते. ब्राझील आणि स्पेन या दोनच संघांना आपल्या यजमानपदाच्या वेळी विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. ब्राझीलने सर्वाधिक ५ वेळा मिळविलेले विश्वविजेतेपद हे सर्व बाहेरच्या देशातील आहेत. यजमानपद भूषविण्याची ब्राझीलची ही दुसरी वेळ आहे. सन १९५० ला चौथ्या विश्वचषकाचे यजमानपद भूषविणाऱ्या ब्राझीलला त्यावेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर १९९८ च्या फ्रान्समधील विश्वचषकातही ब्राझीलने उपविजेतेपद मिळविताना यजमान फ्रान्सविरुद्ध पराभव पत्कारावा लागला होता. ब्राझीलने आत्तापर्यंत दोन वेळा (१९३८ व १९७८) तिसरा क्रमांक मिळविलेला आहे. नेदरलॅन्डच्या बाबतीतही तीन वेळा उपविजेतेपद मिळविणाऱ्या नेदरलॅन्डला एकदाही तिसरा क्रमांक मिळविता आलेला नाही. ज्याप्रमाणे नेदरलॅन्डला तीन वेळा अंतिम फेरीत खेळूनही विजेतेपद मिळविता आलेले नाही त्याचप्रमाणे याआधी १९९८ ला तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीतही नेदरलॅन्डला क्रोएशियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
दोघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी समसमान : ब्राझील आणि नेदरलॅन्ड या दोन संघांमध्ये या आधी ११ सामने झालेले आहेत, त्यापैकी दोघांनीही ३-३ वेळा विजय मिळविलेला आहे, तर पाच सामने अनिर्णित राहिले आहेत. विश्वचषक स्पर्धेचा विचार करता दोघांचीही कामगिरी सारखीच आहे. फ्रान्स येथे झालेल्या १९९८ च्या विश्वचषकात ब्राझीलने उपांत्य फेरीत नेदरलॅन्डला पराभूत केले होते. तर दक्षिण आफ्रिकेत झालेल्या गेल्या वेळच्या २०१० च्या विश्वचषकामध्ये नेदरलॅन्डने ब्राझीलला उपउपांत्य फेरीतच पराभूत करून पराभवाची पराफेड केलेली आहे. त्यामुळे या दोघांचीही आपापसातील कामगिरी अगदी समसमान अशी आहे. उपांत्य लढतीतील दोघांचा खेळ बघता नेदरलॅन्डचे पारडे जड वाटत असले तरी यजमान ब्राझीलला हा तिसरा क्रमांकही आता महत्त्वाचा झालेला आहे आणि त्यासाठी जखमी असूनही नेअमार आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी या सामन्याचे वेळी मैदानात हजर राहणार आहे, तसेच कर्णधार थिएगो सिल्व्हाही संघात परतणार असल्यामुळे उपांत्य फेरीतील बचावाला पडलेल्या खिंडाराला मजबुती मिळेल. त्यामुळे या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यातही चुरस बघायला मिळेल हे निश्चित. गोल्डन बॉल-गोल्डन बुटाचीही चर्चा : अर्जेंटिना आणि जर्मनी यांच्यामध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी आतूर झालेल्या सर्वांनाच गोल्डन बूट आणि गोल्डन बॉल याचा मानकरी कोण असणार आहे याचीही उत्सुकता लागलेली आहे. गोल्डन बुटाचा किताब अर्थातच विश्वचषकामध्ये सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. त्याप्रमाणे या विश्वचषकात आजपर्यंत तरी कोलंबियाचा जेम्स रॉड्रीगेस हा ६ गोल केल्यामुळे सर्वात आघाडीवर आहे. जर्मनीचा थॉमस मुल्लर ५ गोलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी ४ गोलसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रॉड्रीगेसच्या सहाच्या संख्येत काही वाढ होणार नाही, मात्र मुल्लर आणि मेस्सी यांच्यातच अंतिम सामना होत असल्यामुळे दोघांना या किताबासाठी संधी आहे. मुल्लरला केवळ एकच गोल बरोबरीसाठी आणि आघाडी घेण्यासाठी दोन गोल करावे लागतील. तर मेस्सीला बरोबरीसाठी दोन तर आघाडी घेण्यासाठी तीन गोल करावे लागतील. गेल्या तीन लढतीत मेस्सीला एकही गोल करता आलेला नाही. तर अर्जेंटिनाचा बचाव लक्षात घेता थॉमस मुल्लरलाही दोन गोल करणे अवघड आहे. त्यामुळे कोलंबियाचा जेम्स रॉड्रीगेसच आता तरी या किताबाच्या जास्त जवळ आहे, असे चित्र दिसते आहे. गोल्डन बॉलचा किताब हा विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूला दिला जातो आणि या विश्वचषकाचा विचार करता, आत्तापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये चार वेळा मॅन आॅफ द मॅचचा किताब पटकावणारा लिओनेल मेस्सीच या गोल्डन बॉलचा मानकरी होण्याच्या शर्यतीत प्रबळ दावेदार आहे. या अंतिम सामन्यातही त्याचीच भूमिका महत्त्वाची असणार आहे. या अंतिम सामन्यामध्ये मेस्सीकडून चांगला खेळ झाल्यास त्याला विश्वविजेतेपद आणि गोल्डन बुट असे दोन्हीही सर्वाधिक मानाचे चषक उंचवता येणार आहेत आणि मेस्सीच्या असंख्य चाहत्यांचीही तीच इच्छा असणार आहे हे वेगळे सांगायला नको.

Web Title: The third largest hope for the hosts; Golden boot and ball talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.