तिसरीची दाखल, चौथीचे विलंबाने

By Admin | Updated: May 6, 2014 22:01 IST2014-05-06T21:18:50+5:302014-05-06T22:01:59+5:30

अभ्यासक्रम बदलला : प्रशिक्षण वर्गाला अडचणी

Third, the fourth is delayed | तिसरीची दाखल, चौथीचे विलंबाने

तिसरीची दाखल, चौथीचे विलंबाने

अभ्यासक्रम बदलला : प्रशिक्षण वर्गाला अडचणी
नाशिक : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी ते पाचवीपर्यंतच्या वर्गांच्या सर्वच विषयांचा अभ्यासक्रम बदलणार असल्याचे निश्चित असताना केवळ तिसरी अन् चौथीचाच अभ्यासक्रम बदलला. पाचवीचा जुनाच अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. तिसरीची जवळपास सर्वच विषयांची आणि तीनही भाषांतील पुस्तके बाजारात दाखल झाली असून, चौथीच्या पुस्तकांना अद्याप आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचे समजते. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पाठ्यपुस्तक विभागाला बदललेल्या अभ्यासक्रमांबाबतची कोणतीही माहिती मिळत नसल्याने येत्या काळात शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षण वर्गांचे नियोजन रखडले आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी आणि चौथीच्या वर्गांचा अभ्यासक्रम बदलला आहे तर पाचवीसाठी जुनाच अभ्यास असणार आहे. तिसरी आणि चौथीच्या इतिहास आणि भूगोल या विषयांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती. या विषयांच्या अभ्यासक्रमाचा ढाचा बदलून त्यास परिसर अभ्यास एक आणि दोन असे नाव दिले जाणार आहे, अशीही चर्चा होती. परंतु तसे न होता आधीच्या नावाने हे विषय यंदाही असतील.
तिसरीच्या वर्गासाठीचे गणित, माय इंग्लिश ही पुस्तके मराठी, हिंदी, गुजराथी आणि उर्दू भाषेत बालभारतीच्या पाठ्यपुस्तक मंडळाकडे दाखल झाली आहेत. त्याचप्रमाणे बालभारतीची हिंदी अन् मराठी भाषांतील पुस्तके आली आहेत. दरम्यान चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाची माय इंग्लिश, गणित अन् बालभारती या विषयांचीच पुस्तके पाठ्यपुस्तक मंडळाकडे आली असून, इतर विषयांची नवीन पुस्तके येत्या आठवडाभरात येण्याची शक्यता आहे. दोनही वर्गांच्या बदललेल्या अभ्यासक्रमांच्या प्रत्येक विषयाच्या सुमारे ४० ते ४५ हजार पुस्तकांच्या प्रती मंडळाच्या गुदामात दाखल झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्यांचे वितरण केले जाणार आहे. तसेच, बाजारातही काही प्रमाणात पुस्तके दाखल झाली आहेत.
प्रशिक्षणाचे नियोजन रखडले
कोणत्याही वर्गाचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर त्या-त्या विषयांसंदर्भात शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषदेकडूनही तिसरी व चौथीच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. परंतु नवीन अभ्यासक्रमांचे परिपत्रकच न मिळाल्याने संबंधित विभागाला प्रशिक्षण वर्गाचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत.

वेळेत होतील दाखल
तिसरी अन् चौथीचा अभ्यासक्रम बदलला असून, त्यानुसार नवीन पुस्तके दाखल होत आहेत. चौथीची काही पुस्तके येत्या आठवड्यात येतील. त्यानंतर त्यांचे वितरण केले जाणार आहे. सद्यस्थितीत प्रत्येक विषयाच्या ४० ते ५० हजार प्रती मंडळाकडे आहेत.
- व्ही. डी. पगार, प्रभारी भांडार व्यवस्थापक, बालभारती, नाशिक

Web Title: Third, the fourth is delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.