तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता, दंगलीचे लोण ठाणापाड्यात
By Admin | Updated: July 16, 2015 23:56 IST2015-07-16T23:50:57+5:302015-07-16T23:56:46+5:30
डझनभर पोलिसांच्या बदल्या, ६८ पोलीस जखमी, अनेकांची धरपकड

तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता, दंगलीचे लोण ठाणापाड्यात
नाशिक - युवकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर हरसूल गावात उसळलेल्या दंगलीचे लोण पश्चिम पट्ट्यातील ठाणापाडा
गावात पोहोचल्याने पोलिसांची अतिरिक्तकुमक हरसूलसह ठाणापाड्यात तैनात करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची पोलीस प्रशासनाने दखल घेत हरसूल पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह अर्धा डझन पोलीस कर्मचाऱ्यांच्याही अन्यत्र बदल्या केल्या आहेत. या तीन दिवसांत ६८ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, काल (दि.१६) खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जि.प.सदस्य संपतराव सकाळे, मनसेचे सुधाकर राऊत, कॉँग्रेसचे विनायक माळेकर, रवींद्र भोये, ठाणापाड्याचे सरंपच मायावती महेंद्र साबळे, माकपचे भाऊराव राथड, अंबादास चौरे, भिवा पाटील, आनंदा चौधरी यांच्या उपस्थितीत ठाणापाड्यात सायंकाळी उशिरा शांतता समितीची बैठक झाली. बैठकीत खासदार चव्हाण, खासदार गोडसे, आमदार गावित यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सकाळपासूनच ठाणापाड्यात जाळपोळीचे आणि तोडफोडीचे प्रकार सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलीस फौजफाट्यासह ठाणापाड्यात तळ ठोकला होता, तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, आ.निर्मला गावित यांनी ठाणापाड्यात भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. हरसूलच्या दंगलीत काही निरपराध लोकांची पोलिसांनी धरपकड केली असून, त्यांच्या सुटकेसाठी आता पोलिसांनी प्रयत्न करावेत, तसेच नागरिकांनीही त्यांच्या सुरक्षेसाठीच पोलीस असून, शांतता न टिकविल्यास पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागेल, यात सर्वांचेच नुकसान असल्याचे खा.चव्हाण यांनी सांगितले. तत्पूर्वी खासदार चव्हाण, खासदार गोडसे, आमदार गावित, विजय करंजकर, राजाराम पानगव्हाणे, संपतराव सकाळे यांनी खून झालेला युवक रामदास भोये यांच्या कुटुंबीयांचे भेटून सांत्वन केले. तसेच ज्या विहिरीत खून झाला, त्या विहिरीचीही जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना युवकाचा खून झाल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीचे दूरध्वनीवरील संभाषण ऐकविले. तसेच यात हरसूल पोलिसांचा निष्काळजीपणा असल्याचा आरोपही केला.