वडाचीवाडी परिसरात चोऱ्या, जाळपोळीने दहशत
By Admin | Updated: January 11, 2017 00:12 IST2017-01-11T00:12:05+5:302017-01-11T00:12:20+5:30
वडाचीवाडी परिसरात चोऱ्या, जाळपोळीने दहशत

वडाचीवाडी परिसरात चोऱ्या, जाळपोळीने दहशत
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागात होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, चोऱ्यांबरोबरच जाळपोळीच्या घटनेने आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या मेहनतीने आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविलेले भाताचे पीक, घरातील संसारोपयोगी वस्तू आदिंच्या भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. येथील माजी सरपंच त्र्यंबक डमाळे यांच्या राहत्या घराजवळ लावलेल्या दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या. यातील एक सीडी डीलक्स मोटारसायकल (क्र. एमएच १५ ७९२१) ही अर्धवट जळालेल्या अवस्थेत, तर दुसरी दुचाकी (क्र. एमएच १५ ईएल ९१३४) ही चार किलोमीटर अंतरावर नेऊन जाळण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, यापूर्वी शहरात गाड्या जाळण्याचा प्रकार होत होता तो आता ग्रामीण भागातही होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डमाळे यांच्या पत्नी सकाळी उठल्यानंतर बाहेर येऊन बघितले असता दोन्ही मोटारसायकल दिसल्या नाहीत. त्यांनी आरडाओरड करत केली असता यावरून नागरिकांनी गाड्यांचा शोध घेतला असता ६०० ते ७०० मीटरवर एका शेतामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्यांना एक मोटारसायकल दिसली. त्यानंतर डमाळे यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यू. डी. अहिरे, कर्डक करीत आहेत.