सौभाग्यलेण्यावर चोरट्यांचा डोळा

By Admin | Updated: April 24, 2016 23:57 IST2016-04-24T23:54:31+5:302016-04-24T23:57:38+5:30

कोट्यवधींची लूट : गुन्हे उघडकीस येण्याचे अत्यल्प प्रमाण, महिलांमध्ये असुरक्षितता

The thieves eye on good fortune | सौभाग्यलेण्यावर चोरट्यांचा डोळा

सौभाग्यलेण्यावर चोरट्यांचा डोळा

नाशिक : शहरातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याबरोबरच चोरट्यांचा शोध घेणे शहर पोलिसांसाठी आव्हान असून, गेल्या सव्वापाच वर्षात विचार करता सोनसाखळी चोरीच्या ७०७ घटनांपैकी अवघ्या २२४ घटनांचाच पोलिसांना यशस्वी तपास केला आहे़ सोनसाखळी चोरीच्या घटना व यशस्वी तपासामधील तफावत पाहता पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जाते आहे़ दरम्यान, शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़शहरातील इंदिरानगर, गंगापूर, उपनगर, पंचवटी, नाशिकरोड या पोलीस ठाणे हद्दीत सकाळी - सायंकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला या सोनसाखळी चोरट्यांच्या रडारवर असतात़ धूम स्टाइलने दुचाकीवर येऊन पाठीमागून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचायचे तर कधी पत्ता विचारण्याच्या बहाणा करायच्या क्लृप्त्या या चोरट्यांकडून वापरल्या जातात़ विशेष म्हणजे काम फत्ते झाल्यानंतर चोरटे क्षणार्धात पलायन करतात अन् पोलिसांच्या नाकाबंदीतही हाती लागत नाहीत़
सद्यस्थितीत लग्नसराईचे दिवस असल्याने तसेच मुलांना सुटी असल्याने महिला खरेदीसाठी बाहेर पडतात़ दुचाकीवरून येऊन रस्त्यावरून जाणाऱ्या महिला वा वृद्धांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा सोनसाखळी चोरटे खेचून नेतात़ सोनसाखळी खेचल्यानंतर चोरट्यांना पळ काढण्यात यश येत असल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते़ शहरात सोनसाखळीची घटना घडत नाही, असा एखादाच दिवस जातो़ विशेष म्हणजे या सोनसाखळी चोरट्यांना आवर घालण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते़
सोनसाखळी चोरीतील कमी धोका, कमी श्रम, गुन्हे करण्यास सोपे, पकडले जाण्याची शक्यता कमी, चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणे सोपे. यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली असून, या घटनांमध्येही वाढ झाली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The thieves eye on good fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.