चोरट्यांचा धुमाकूळ; गस्तीची मागणी
By Admin | Updated: September 14, 2015 22:46 IST2015-09-14T22:41:32+5:302015-09-14T22:46:00+5:30
चोरट्यांचा धुमाकूळ; गस्तीची मागणी

चोरट्यांचा धुमाकूळ; गस्तीची मागणी
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, रविवारी रात्री गावात चार ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला. यात चोरट्यांनी रोख २५ हजार रुपये चोरून नेले असून, तीन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
येथील श्रीराम चौकात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या केल्या. सोमवंशी टी हाउसचा मागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. गल्ल्यातील २५ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. त्याचबरोबर चोरट्यांनी दुकानातील दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न केला.
तथापि, दरवाजातून गाडी न निघाल्याने त्यांनी रोख रक्कम घेऊन पळ काढला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा विकास उगले यांच्या किराणा दुकानाकडे वळविला. उगले यांनी दुकानात रोख रक्कम न ठेवल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. चोरट्यांनी जवळील सचिन गव्हाणे यांचे गुदाम फोडले. गुदाममधील माल अस्ताव्यस्त केला. त्यानंतर अशोक नरोडे यांच्या मालकीच्या खोलीत असणाऱ्या रहिवाशाच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी
आत प्रवेश केला. तेथेही चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
पाथरे येथे चोरटे आल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस सोमवारी उशिरा घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी पाथरे येथे अशोक घोटेकर यांच्या घराजवळून दुचाकी चोरीला गेली आहे. जनावरे चोरीला जाण्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत.
पाथरे हायस्कूलमधून ५० हजारांचे संगणक चोरीला गेल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे. पाथरे परिसरात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी पाथरे शिवारातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)