चोरटे ४८ तासांत गजाआड
By Admin | Updated: December 21, 2015 23:19 IST2015-12-21T23:18:17+5:302015-12-21T23:19:51+5:30
चोरटे ४८ तासांत गजाआड

चोरटे ४८ तासांत गजाआड
नाशिकरोड : सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत; दोन लाख जप्तनाशिकरोड : मुक्तिधाम समोरील टिळकपथ येथील दृष्टी सिरॅमिक दुकानाचे शटर उचकटून अडीच लाखांची रोकड चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने ४८ तासांत गजाआड केले. त्यांच्याकडून दोन लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.
टिळकपथ साईकृपा कॉम्प्लेक्समधील दृष्टी सिरॅमिक या दुकानांचे बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून गल्ल्यातील २ लाख ५५ हजारांची रोकड चोरून नेली होती. दुकानचालक रज्जाक अल्लाउद्दीन शेख हे बुधवारी सकाळी दुकान उघडण्यास आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता दुकानात चोरी करणारे दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये नजरकैद झाले होते. त्या फुटेजच्या आधारे व खबऱ्यांची मदत घेऊन पोलीस उपनिरीक्षक बी. एस. गायकवाड, श्याम कोटमे, प्रकाश भालेराव, अनिल लोंढे, अरुण पाटील, उत्तम पवार यांनी चोरटा भगवान ऊर्फ मन्या रामदास गाढवे (३०, रा. ताजनपुरे मळा, चेहेडी) याला व त्याचा दुसरा साथीदार सुनील शशीराव बिंडे (३०) रा. सुभाषरोड याला पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांकडून दुकानातून चोरलेल्या दोन लाख ५५ हजार रोकडपैकी दोन लाख ३० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. संशयित मन्या गाढवे याला नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
दरम्यान, नाशिक शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आरोपी कैद होऊनही पोलिसांना सापडले नाहीत. त्यांचा शोध लागावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)