नाशिकरोड : टागोर नगर येथील बजरंग स्मृती सोसायटीतील बंद फ्लॅटचा कडीकोंडा तोडून ३० हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान चोरीची घटना लक्षात आल्याने स्थानिक नागरिकांनी एका चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कामगार उपायुक्त प्रभाकर बनकर यांचा टागोरनगर येथील बजरंग स्मृती सोसायटीत बंद फ्लॅट आहे. तेथे कोणी राहात नसून संसारोपयोगी वस्तू व इतर साहीत्य घरात आहे. गुरूवारी रात्री अज्ञात तिघा चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश मिळविला. घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा २९ हजार ५००चा ऐवज चोरून तिघे चोरटे पळुन जाण्याच्या तयारीत होते. बनकर यांच्या फ्लॅटच्या घराशेजारी राहाणारे विद्या सांगळे यांना बंद फ्लॅटमधून काहीतरी आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन बघितले असता फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडलेला दिसला. सांगळे यांनी आरडाओरड केली असता दोघे चोरटे पळुन गेले. तर शालीमार मदीना चौक येथे राहाणारा राजेश रामशंकर शर्मा या चोरट्यास स्थानिक रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
३० हजाराचा ऐवज चोरून
By admin | Updated: November 23, 2014 00:02 IST